आकाशवाणी, इच्छा देवी व अजिंठा चौफुली सर्कल परिसरातील दुरवस्था — मनसेचा इशारा : साफसफाई न झाल्यास सर्कलमध्ये बकऱ्या चारणार! आंदोलनाचा इशारा


✒️ पराग काथार, खबर महाराष्ट्र न्यूज – जळगाव शहरातील प्रमुख आकाशवाणी चौक, इच्छा देवी सर्कल आणि अजिंठा चौफुली सर्कल परिसरात गेल्या काही महिन्यांपासून मोठ्या प्रमाणावर गवत, झुडपे व जंगली झाडे उगवून परिसर विद्रूप आणि अस्वच्छ झाला आहे. या ठिकाणाच्या दुरवस्थेकडे प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याने महाराष्ट्र नवनिर्माण सेना, जळगाव शहर तर्फे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण (NHAI) यांना निवेदन देऊन तातडीने साफसफाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
मनसेने आपल्या निवेदनात नमूद केले आहे की, “आकाशवाणी चौक हा शहरातील एक प्रमुख व गर्दीचा चौक असून, या मार्गावरून दररोज अनेक अधिकारी, उद्योजक व नागरिकांची ये-जा सुरू असते. अशा महत्त्वाच्या ठिकाणाचे विद्रूप दृश्य हे शहराच्या सौंदर्यावर डाग ठरणारे आहे.”
पक्षाने पुढील तीन दिवसांत सर्कल परिसराची साफसफाई न झाल्यास प्रतीकात्मक निषेध म्हणून त्या ठिकाणी बकऱ्या चारण्यात येतील, असा इशारा दिला आहे. या इशाऱ्यानंतर संबंधित प्रशासनाने तातडीने पावले उचलण्याची नागरिकांमध्ये अपेक्षा निर्माण झाली आहे.
दरम्यान, महामार्ग प्राधिकरणाचे प्रकल्प अधिकारी यांनी स्पष्टीकरण देताना सांगितले की, “सदर सर्कल हा शहराच्या सीमेत येत असल्यामुळे त्याची स्वच्छतेची जबाबदारी ही जळगाव महापालिकेची आहे. या संदर्भात मनसेला अधिकृत पत्र देण्यात येईल.”
या प्रसंगी मनसेचे जिल्हाध्यक्ष ॲड. जमील देशपांडे, महानगराध्यक्ष किरण तळले, उपमहानगराध्यक्ष श्रीकृष्ण मेंगडे, राजेंद्र निकम, प्रकाश जोशी, शेतकरी सेनेचे जिल्हाध्यक्ष अविनाश पाटील, वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष रज्जाक सय्यद, ॲड. सागर शिंपी, विकास पाथरे व विभाग अध्यक्ष दीपक राठोड आदी पदाधिकारी उपस्थित होते.
----------------------------------

आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post