खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जळगाव जिल्हा कारागृहात बुधवारी (दि. २९ ऑक्टोबर) दुपारी चार वाजता बॅरेक क्रमांक २ मध्ये दोन बंदी गटांमधील वैमनस्यातून झालेल्या राड्यात एका बंदीवर चार जणांनी जीवघेणा हल्ला केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकारामुळे कारागृहातील सुरक्षा व्यवस्थेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.
तेजस दिलीप सोनवणे (वय २५, रा. कांचन नगर, जळगाव) हा एका गुन्ह्यात शिक्षा भोगत कारागृहात आहे. बुधवारी दुपारी तो बॅरेक क्रमांक २ मध्ये झोपलेला असताना, त्याच कारागृहातील पराग रविंद्र आरखे, बबलू उर्फ विशाल राजू गागले, भूषण विजय माळी उर्फ भाचा आणि सचिन कैलास चव्हाण या चार बंदींनी त्याला घेरले.
चौघांनी तेजसला शिवीगाळ केली. त्याने कारण विचारले असता आरोपींनी, “तू भूषण माळी उर्फ भाचा याचा विरोधक आहेस का?” असे म्हणत त्याला धमकावले आणि टणक वस्तूने डोक्यावर वार करून गंभीर जखमी केले. एवढेच नव्हे, तर त्याला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.
दरम्यान, कर्तव्यावर असलेल्या जेल शिपायांनी तत्काळ धाव घेत भांडण थांबवले. जखमी तेजस सोनवणे याला तातडीने जळगाव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले आहे.
या घटनेनंतर रात्री ९.३० वाजता तेजस सोनवणे यांच्या तक्रारीवरून जिल्हापेठ पोलीस ठाण्यात आरोपी पराग आरखे, बबलू गागले, भूषण माळी उर्फ भाचा आणि सचिन चव्हाण या चार बंदींविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस अधिक तपास करीत आहेत.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------