खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - मुक्ताईनगरमधील राष्ट्रीय महामार्गालगत असलेल्या केंद्रीय क्रीडा राज्यमंत्री रक्षाताई खडसे यांच्या मालकीच्या "रक्षा ऑटो फ्युएल्स" या पेट्रोल पंपावर गुरुवारी रात्रीच्या सुमारास दरोड्याची धक्कादायक घटना घडली. सशस्त्र दरोडेखोरांनी कर्मचाऱ्यांना मारहाण करत रोख रक्कम लुटून घेतली असून परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
दोन कर्मचाऱ्यांवर हल्ला, एक लाखांची रोकड लंपास
ही घटना रात्री सुमारे १०:४५ वाजण्याच्या सुमारास घडली. दोन दुचाकींवर आलेल्या पाच अज्ञात दरोडेखोरांनी पेट्रोल पंपावर तैनात असलेल्या प्रकाश माळी आणि दीपक खोसे या कर्मचाऱ्यांवर अचानक हल्ला चढवला. दोघांनाही बंदुकीचा धाक दाखवत मारहाण करण्यात आली आणि त्यांच्याकडे व काउंटरमध्ये असलेली अंदाजे एक लाख रुपयांची रोकड जबरदस्तीने चोरून नेण्यात आली.
इलेक्ट्रॉनिक उपकरणांची तोडफोड, सीसीटीव्हीही फोडले
हल्लेखोरांनी केवळ पैशांवरच नव्हे, तर ऑफिसमधील संगणक, प्रिंटर, सीसीटीव्ही कॅमेरे आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणे देखील नष्ट केली. त्यामुळे तपासात अडथळा येण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
घटनास्थळी पोलिसांची तात्काळ धाव; शोधमोहीम सुरू
घटनेची माहिती मिळताच पोलिस निरीक्षक आशिषकुमार अडसूळ आपल्या पथकासह घटनास्थळी दाखल झाले. प्राथमिक तपासात दरोडेखोर बोहर्डी गावाच्या दिशेने पसार झाल्याचे समजते. पोलिसांनी त्या दिशेने शोधमोहीम राबवली असून सीसीटीव्ही फुटेज आणि स्थानिकांच्या मदतीने दरोडेखोरांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
आठ दिवसांत चार घरफोड्या, नागरिकांत भीतीचे वातावरण
मुक्ताईनगरमध्ये गेल्या आठ दिवसांत चार वेगवेगळ्या ठिकाणी घरफोडीच्या घटना घडल्या असून, त्यातील दोन दिवसा ढवळ्या झाल्या आहेत. आता पेट्रोल पंपावर दरोड्याची घटना घडल्याने नागरिकांमध्ये सुरक्षेबाबत चिंता वाढली आहे. रहदारीच्या मुख्य रस्त्यावर घडलेल्या या प्रकारामुळे प्रशासनाची कार्यक्षमता पुन्हा प्रश्नचिन्हात आली आहे.
पोलीस प्रशासनावर दबाव; तातडीने कारवाईची मागणी
दरोड्याची घटना घडल्यानंतर परिसरातील नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली, मात्र तोपर्यंत आरोपी पसार झाले होते. आता नागरिकांकडून पोलिसांकडून गंभीर आणि तात्काळ कारवाईची मागणी केली जात आहे, तसेच सुरक्षा उपाययोजना वाढवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त होत आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
दरोडा