खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जळगाव जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून पिके, पशुधन आणि शेतीचे साधनसामग्री वाहून गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. या गंभीर परिस्थितीत शासनाने तातडीने जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करून कोणतेही निकष न लावता सर्व शेतकऱ्यांना मदत द्यावी, अशी मागणी महाविकास आघाडीच्या नेत्यांनी केली आहे. अन्यथा जिल्ह्यात कोणत्याही मंत्र्यांना रस्त्यावर फिरू देणार नाही, असा इशारा आघाडीच्या नेत्यांनी गुरुवारी दिला.
गेल्या काही दिवसांतील अतिवृष्टीमुळे जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांतील शेतकऱ्यांचे पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. कापूस, सोयाबीन, मूग, उडीद, भात आदी पिकांची पूर्णपणे नासधूस झाली असून शेतकऱ्यांच्या हातात काहीच राहिलेले नाही. शासनाने नुकसानीचा सर्वेक्षण अहवाल तयार करण्यासाठी विविध निकष लावले आहेत. परंतु हे निकष अन्यायकारक असून हजारो शेतकऱ्यांना मदतीपासून वंचित ठेवले जाण्याची शक्यता आहे, अशी नाराजी आघाडीच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केली.
महाविकास आघाडीच्या नेत्यांनी सांगितले की, शासन मदत देताना आकडेमोड आणि कागदी सर्वेक्षणावर भर देत आहे. प्रत्यक्ष शेतांमध्ये जाऊन परिस्थितीचा आढावा घेतला गेला, तर नुकसान किती मोठ्या प्रमाणावर झाले आहे हे स्पष्ट होईल. शेतकऱ्यांना तातडीची आर्थिक मदत, विजबिल माफी, बियाणे आणि खतांचे अनुदान तसेच कर्जमाफीची योजना राबवावी, अशी मागणी त्यांनी केली. शासनाने निकषांचा गोंधळ न करता संपूर्ण जिल्हा ओला दुष्काळग्रस्त घोषित करावा, अन्यथा मंत्र्यांच्या दौर्यांना जिल्ह्यात विरोध केला जाईल, असा इशाराही देण्यात आला.
या मागणीसाठी गुरुवारी दुपारी महाविकास आघाडीच्या प्रतिनिधींनी जिल्हाधिकारी कार्यालयात जाऊन निवेदन सादर केले. निवेदनात संपूर्ण जळगाव जिल्हा तसेच सर्व तालुके ओला दुष्काळग्रस्त घोषित करण्याबरोबरच शेतकऱ्यांना थेट खात्यावर आर्थिक मदत देण्याची मागणी करण्यात आली. तसेच शेतीचे पुनर्बांधणी कार्यक्रम सुरू करण्यासह नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी स्वतंत्र पुनर्वसन पॅकेज देण्याची मागणीही करण्यात आली.
या प्रसंगी शिवसेना उपनेते गुलाबराव वाघ, राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) निरीक्षक भास्कर काळे, शिवसेना जिल्हाप्रमुख कुलभूषण पाटील, राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष प्रमोद पाटील, माजी जिल्हाध्यक्ष रवींद्र (भैय्या) पाटील, शिवसेना महानगर प्रमुख शरद तायडे, राष्ट्रवादी काँग्रेस महानगर अध्यक्ष एजाज मलिक, विकास पवार, मंगला पाटील, प्रतिभा शिरसाठ, जगतराव पाटील, अॅड. सचिन पाटील, भाऊसाहेब सोनवणे, प्रमोद घुगे, प्रशांत सुरळकर, मजहर पठाण, रमेश पाटील, विश्वनाथ पाटील, वाय.एस. महाजन, लक्ष्मण पाटील, भिका पाटील, संजय पाटील, एन.डी. पाटील, राजेंद्र पाटील, विश्वजित पाटील आदींसह महाविकास आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
महाविकास आघाडी