जळगाव, दि. ८ (प्रतिनिधी / पराग काथार):
जळगाव लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मंगळवारी सायंकाळी काव्यरत्नांजली चौकात सापळा रचून एरंडोल तालुक्यातील रिंगणगाव ग्रामपंचायतीचे सरपंच व दोन साथीदारांना ८० हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहात पकडले. जलजीवन मिशन अंतर्गत पूर्ण झालेल्या नळ पाणीपुरवठा योजनेच्या हस्तांतर करारनाम्यासाठी ही लाच मागितल्याचे उघड झाले आहे.
तक्रारदार हे शासकीय कंत्राटदार असून त्यांनी १ कोटी ५० लाख रुपयांचे काम पूर्ण केले होते. त्यापैकी २३ लाख रुपयांचे बिल हस्तांतर करारनामा न झाल्याने रखडले होते. सरपंच भानुदास पुंडलिक मते व सदस्य पती समाधान काशीनाथ महाजन यांनी करारनामा देण्यासाठी १ लाख रुपये लाच मागितली होती. चर्चेनंतर ८० हजारांवर सौदा ठरला. तक्रारदाराने ७ ऑक्टोबर रोजी एसीबीकडे तक्रार दाखल केली.
८ ऑक्टोबर रोजी एसीबी पथकाने सापळा रचून तक्रारदाराच्या पंटर संतोष नथ्थू पाटील मार्फत लाच रक्कम दिली. पाटीलने पैसे स्वीकारताच एसीबीने कारवाई केली आणि तिघांना रंगेहात अटक केली.
या कारवाईचे नेतृत्व पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर यांनी केले. त्यांच्यासोबत पोलीस निरीक्षक स्मिता नवघरे, पीएसआय सुरेश पाटील, नाईक बाळू मराठे आणि कॉन्स्टेबल अमोल सूर्यवंशी यांच्या पथकाने संयुक्तपणे ही कारवाई केली.
या घटनेमुळे रिंगणगाव ग्रामपंचायतीत खळबळ उडाली असून, स्थानिक प्रशासनातील भ्रष्टाचारावर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
लाचलुचपत विभाग