✒️ पराग काथार, खबर महाराष्ट्र न्यूज – एरंडोल पोलीस ठाण्यात कार्यरत असलेले पोलीस हवालदार बापू लोटन पाटील यांना ३,००० रुपयांची लाच घेताना धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या (ACB) पथकाने रंगेहाथ पकडले आहे. या कारवाईमुळे पोलिस खात्यात खळबळ उडाली असून, लाचखोरांना धडकी भरवणारी ठरली आहे.
तक्रारदार हे पारोळा तालुक्यातील म्हसवे गावचे रहिवासी असून, दिनांक १ सप्टेंबर २०२५ रोजी एरंडोल पोलीस ठाण्यात त्यांच्या विरोधात अपघातासंबंधी गुन्हा दाखल झाला होता. गुन्ह्याच्या तपासादरम्यान, त्यांची मोटारसायकल पोलिसांनी ताब्यात घेतली होती. सदर तपास पोलीस हवालदार बापू पाटील यांच्या ताब्यात होता. तक्रारदाराने गुन्ह्यासंदर्भात आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करून, दिनांक १६ ऑक्टोबर २०२५ रोजी मोटारसायकल परत घेण्यासाठी बापू पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी पाटील यांनी तक्रारदाराकडे मोटारसायकल परत देण्यासाठी ३,००० रुपये लाचेची मागणी केली. या लाचेबाबत तक्रारदाराने तत्काळ धुळे एसीबी कार्यालयाशी संपर्क साधून माहिती दिली.
खात्रीशीर पडताळणी आणि कारवाई
धुळे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने तक्रारीची खातरजमा केल्यानंतर, पाटील यांनी प्रत्यक्ष पंचांसमोर तक्रारदाराकडून ३,००० रुपये लाच घेण्याची तयारी दर्शवली. या अनुषंगाने ACB पथकाने एरंडोल येथे सापळा रचून, दिनांक १७ ऑक्टोबर रोजी कारवाई केली.
तयार सापळ्यात तक्रारदाराकडून ३,००० रुपयांची रक्कम स्वीकारताना पोलीस हवालदार बापू पाटील यांना रंगेहाथ पकडण्यात आले. ही रक्कम त्यांनी स्वतःच्या ताब्यात घेतली होती, त्यामुळे लाच घेण्याचा गुन्हा स्पष्टपणे सिद्ध झाला.
कारवाईत सहभागी अधिकारी व कर्मचारी
ही कारवाई धुळे एसीबीचे पोलीस उपअधीक्षक सचिन साळुंखे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली. यामध्ये पोलीस निरीक्षक यशवंत बोरसे, पोलीस निरीक्षक पद्मावती कलाल, तसेच पोहेकॉ. राजन कदम, मुकेश अहिरे, प्रविण मोरे, संतोष पावरा, पोकॉ. मकरंद पाटील, प्रविण पाटील, प्रशांत बागुल, सागर शिर्के, प्रितेश चौधरी, रेश्मा परदेशी, पोहेकॉ. सुधीर मोरे आणि जगदीश बडगुजर यांच्या समावेशाने ही यशस्वी कारवाई पार पडली.
पुढील कायदेशीर कारवाई सुरू
सदर प्रकरणी बापू पाटील यांच्याविरुद्ध भ्रष्टाचार प्रतिबंधक अधिनियम १९८८ (सुधारित २०१८) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील कायदेशीर कारवाई प्रक्रिया सुरू आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------