खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | शहरातील प्रमुख रस्ते, चौक आणि वर्दळीच्या परिसरांतील तब्बल २,००० हून अधिक पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद असून त्यामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा गंभीर प्रश्न उभा राहिला आहे. रात्रीच्या वेळी शहरातील विविध रस्त्यांवर अंधाराचे साम्राज्य पसरले असून, वाहनधारकांना अपघातांचा सामना करावा लागत आहे. विशेषतः महिलांना, ज्येष्ठ नागरिकांना आणि रात्री उशिरा प्रवास करणाऱ्या नागरिकांना या अंधारामुळे भीतीच्या वातावरणातून जावे लागत आहे.
पथदिवे बंद असल्यामुळे वाहतुकीस अडथळा निर्माण होत असून, रस्त्यांवरील दृश्यता कमी झाल्याने अपघातांचे प्रमाण वाढण्याची शक्यता आहे. याशिवाय, अंधाराचा गैरफायदा घेत चोरी, लूटमार यांसारख्या गुन्हेगारी घटनांना निमंत्रण मिळण्याचा धोका निर्माण झाला आहे. विशेषतः निर्जन रस्त्यांवर किंवा वर्दळीच्या ठिकाणी अचानक अंधार असल्यामुळे सामान्य नागरिक भयभीत झाले आहेत.
नागरिकांच्या तक्रारींकडे दुर्लक्ष
महापालिकेकडे वारंवार तक्रारी करूनही या समस्येकडे दुर्लक्ष केले जात असल्याचा नागरिकांचा आरोप आहे. अनेक वेळा सूचना देऊनही दिवे सुरू झाले नाहीत. ऐन दिवाळीच्या काळात शहराचा अर्धा भाग अंधारात बुडणार असल्याची शक्यता निर्माण झाली आहे. स्वातंत्र्य चौक ते आकाशवाणी आणि महाबळ कॉलनी, डी-मार्ट, मोहाडी रोड या प्रमुख रस्त्यांवरील पथदिवे गेल्या अनेक दिवसांपासून बंद आहेत.
शहरातील मुख्य रस्ते, सार्वजनिक ठिकाणे आणि चौकांमध्ये अंधार असणे हे केवळ गैरसोयीचे नसून नागरिकांच्या सुरक्षेला गंभीर धोका ठरतो. त्यामुळे पथदिव्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची गरज अधोरेखित होत आहे. महापालिकेच्या हलगर्जी कारभारामुळे नागरिकांमध्ये संतापाची लाट पसरली आहे.
या समस्येवर महापालिकेचे विद्युत विभाग प्रमुख संदीप मोरे यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, “नवीन सेंट्रलाईज निविदा प्रक्रिया सुरु होण्यास थोडा वेळ लागणार असल्याने, शासनाच्या मंजुरीनुसार तात्पुरत्या निविदांच्या आधारे १८,००० पथदिव्यांच्या देखभाल व दुरुस्तीची प्रक्रिया सुरु करण्यात आली आहे. शहरातील अंधार लवकरच दूर केला जाईल, अशी महापालिकेची पूर्ण तयारी आहे.”
नागरिकांची मागणी – शहर पुन्हा प्रकाशमय करा
दरम्यान, नागरिकांनी जोरदार मागणी केली आहे की, महापालिकेने या प्रश्नाची तातडीने दखल घेऊन बंद पथदिव्यांची दुरुस्ती तात्काळ करावी आणि शहराला पुन्हा एकदा प्रकाशमय करावे. फक्त निविदा प्रक्रिया किंवा आश्वासनापुरते थांबू नये, तर प्रत्यक्ष काम वेगाने व्हावे, अशी नागरिकांची ठाम भूमिका आहे.
शहरातील पथदिवे बंद असल्याने निर्माण झालेला अंधार हा केवळ प्रकाशाचा अभाव नाही, तर नागरिकांच्या सुरक्षेवर घाला आहे. प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देऊन जलद आणि परिणामकारक पावले उचलावीत, अशी अपेक्षा सर्वसामान्य नागरिकांकडून व्यक्त होत आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
महापालिका जळगाव