खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - दसऱ्यासारख्या सणाच्या दिवशी जळगाव शहरातील काशमवाडी परिसरात जुन्या वादातून एक खळबळजनक घटना घडली आहे. ज्ञानेश्वर उर्फ नाना भीकन पाटील (वय २७) या तरुणावर दोन हल्लेखोरांनी धारदार कोयत्याने वार करून त्याचा खून केल्याची धक्कादायक घटना गुरुवार, ३ ऑक्टोबर रोजी रात्री १२ वाजेच्या सुमारास घडली.
घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, काशमवाडी परिसरात राहणारा नाना पाटील हा आपल्याच ओळखीतील एका तरुणासोबत किरकोळ वादात अडकला होता. हा वाद काही दिवसांपासून सुरू होता. मंगळवारी रात्री नाना आपल्या घराजवळील एकता मित्र मंडळ परिसरात उभा असताना दोन तरुणांनी अचानक त्याच्यावर हल्ला चढवला. सुरुवातीला वादविवाद झाल्यानंतर या दोघांनी नानावर धारदार कोयत्याने सपासप वार केले.
या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या नानाला त्याच्या मित्रांनी तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले. मात्र, उपचारादरम्यान त्याचा दुर्दैवी मृत्यू झाला.
घटनेची माहिती मिळताच एमआयडीसी पोलीस ठाण्याचे निरीक्षक बबन आव्हाड, उपनिरीक्षक चंद्रकांत धनके आणि त्यांच्या पथकाने तात्काळ घटनास्थळी धाव घेतली. सध्या पोलीस हल्लेखोरांचा शोध घेत असून आरोपी फरार असल्याचे समजते.
या घटनेमुळे काशमवाडी परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांमध्ये खळबळ उडाली आहे. पोलीसांनी तपासाची चक्रे फिरवली असून, लवकरच आरोपींना अटक होईल, असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे.
Tags
जळगाव