जळगाव जिल्हा हादरला – दोन दिवसांत दोन खून; पोलिसांसमोर नवे आव्हान

राजकारणी व्यक्तीच्या मुलाकडून तरुणाची हत्या केल्याची चर्चा

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जिल्ह्यात खुनाच्या घटना थांबण्याचे नाव घेत नाहीत. दोन दिवसांपूर्वी जळगाव शहरातील कासमवाडी परिसरात नाना पाटील या तरुणाचा खून झाल्यानंतर आज पुन्हा भुसावळ तालुक्यातील कंडारी परिसरात एका तरुणाचा खून झाल्याने खळबळ उडाली आहे. सलग दोन खुनांच्या घटनांमुळे जिल्ह्यात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगाव शहरातील दोन तरुण काही कारणास्तव भुसावळ शहरातील कंडारी भागात गेले होते. रात्री सुमारास दहा वाजताच्या दरम्यान त्यांच्यात वाद झाला. वादाचे रूपांतर चक्क हाणामारीत झाले आणि याचदरम्यान एका तरुणावर धारदार शस्त्राने वार करण्यात आले.

ही धक्कादायक घटना कंडारीतील महादेव मंदिराजवळील एका बियर बारच्या परिसरात घडली. गंभीर जखमी अवस्थेत त्याला तातडीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. मृत तरुणाचे नाव जितेंद्र कोळी (वय ३५, रा. जळगाव) असे समोर आले आहे.

घटनेची माहिती मिळताच भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. पंचनामा करून तपासाची चक्रे सुरू करण्यात आली आहेत. दरम्यान, प्राथमिक चौकशीत मारेकरी हा जळगाव शहरातील एका नामांकित राजकारणी व्यक्तीचा मुलगा असल्याची चर्चा असून पोलिसांकडून याची खात्री करून घेतली जात आहे.

सदर घटनेने संपूर्ण जिल्ह्यात पुन्हा एकदा भीतीचे सावट निर्माण झाले आहे. काही दिवसांत दोन खून होणे हा पोलिसांसाठी मोठा आव्हान ठरत असून जिल्ह्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post