✒️ पराग काथार, खबर महाराष्ट्र न्यूज - अमळनेर येथे महाविकास आघाडीने आयोजित केलेल्या ‘जन आक्रोश मोर्चा’ दरम्यान शिवसेना (उद्धव ठाकरे गट) नेते आणि माजी खासदार उन्मेष पाटील यांनी केलेल्या वक्तव्यामुळे राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. पाटील यांनी विद्यमान जळगाव लोकसभा खासदार स्मिता वाघ यांच्याविषयी “अपघाती खासदार” अशी टीका केली होती. त्याचबरोबर त्यांनी मुख्यमंत्री, आमदार आणि खासदारांबाबतही अर्वाच्य शब्दांचा वापर केल्याचा आरोप भाजप कार्यकर्त्यांनी केला आहे.
या वक्तव्याच्या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी जळगावात तीव्र आंदोलन छेडले असून, उन्मेष पाटील यांनी तत्काळ जाहीर माफी मागावी, अन्यथा त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात येईल, असा इशारा दिला आहे. इतकेच नव्हे तर, त्यांनी माफी न मागितल्यास "जळगावात फिरू देणार नाही" असा रोष व्यक्त करत आंदोलन तीव्र करण्याचा इशाराही दिला आहे.
भाजप कार्यकर्त्यांनी उन्मेष पाटील यांच्यावर टीका करताना “गव्हाच्या शेतातील गांजाचे झाड म्हणजे उन्मेष पाटील” असे उपरोधिक भाष्य केले आहे. कार्यकर्त्यांनी पुढे बोलताना सांगितले की, स्मिता वाघ या लहानपणापासूनच एबीव्हीपीच्या माध्यमातून सामाजिक कार्यात सक्रीय असून, महिला आघाडीच्या प्रदेशाध्यक्ष पदापासून ते विधान परिषद सदस्या आणि आता लोकसभा खासदार पदापर्यंत त्यांनी सातत्याने जबाबदारी पार पाडली आहे.
त्यामुळे अशा महिलाविरोधात बेताल आणि अवमानकारक भाषेत बोलणे कोणालाही शोभणारे नाही, असे भाजप कार्यकर्त्यांचे मत आहे. त्यांनी स्पष्टपणे सांगितले की, स्मिताताई वाघ यांचे तिकीट कापून उन्मेष पाटील यांना खासदारकी मिळालेली असल्याने, खरे अपघाती खासदार उन्मेष पाटीलच आहेत, अशी टीकाही कार्यकर्त्यांनी केली आहे.
संपूर्ण प्रकरणावरून जळगावातील राजकीय वातावरण चांगलेच तापले असून, पुढील काही दिवसांत हे प्रकरण आणखी गाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. भाजप कार्यकर्त्यांच्या आक्रमक भूमिकेमुळे उन्मेष पाटील यांना आता यावर स्पष्ट भूमिका घ्यावी लागणार आहे, अन्यथा परिस्थिती हाताबाहेर जाऊ शकते.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------