संजय पवारांच्या वक्तव्यावर आमदार एकनाथ खडसेंचा प्रतिप्रश्न, संचालक मंडळाला मालमत्ता विकण्याचा अधिकार कोणी दिला?

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - जळगाव जिल्हा बँकेच्या वारशाचे प्रतीक मानली जाणारी ‘दगडी बँक’ विक्रीस काढण्याचा निर्णय तातडीने मागे घ्यावा, अशी ठाम भूमिका आमदार एकनाथ खडसे यांनी व्यक्त केली आहे. यासोबतच जिल्हा बँकेतील २२० कर्मचाऱ्यांची भरती १०० टक्के पारदर्शकपणे आणि IBPS सारख्या नामांकित एजन्सीमार्फतच करण्याची मागणी त्यांनी केली आहे.

संजय पवारांच्या वक्तव्यावर प्रतिप्रश्न

जिल्हा बँकेचे चेअरमन संजय पवार यांनी १ ऑक्टोबर रोजी पत्रकार परिषदेत बोलताना, याआधी मधुकर सहकारी साखर कारखाना, जे.टी. महाजन सहकारी सूतगिरणी, रावेर सहकारी साखर कारखाना, बेलगंगा सहकारी साखर कारखाना विक्रीस काढण्यात आले होते, त्यावेळी विरोध का झाला नाही? असा सवाल उपस्थित केला होता. यावर खडसे म्हणाले की, त्या संस्थांवर जिल्हा बँकेचे कर्ज होते व कर्ज वसुलीसाठीच विक्री आवश्यक होती. मात्र, दगडी बँकेची इमारत ही बँकेची स्वतःची मालमत्ता असून तिच्यावर कोणतेही कर्ज नाही. शेजारील जागेच्या किंमतीनुसार या मालमत्तेची किंमत किमान ६५ कोटी रुपये असू शकते. अशा स्थितीत केवळ संचालक मंडळाला ही मालमत्ता विकण्याचा अधिकार कोणी दिला? असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

बँकेतील नोकरभरतीत पारदर्शकता आवश्यक

खडसे यांनी जिल्हा बँकेतील २२० कर्मचाऱ्यांच्या भरतीला सरकारकडून मिळालेल्या परवानगीचे स्वागत केले. मात्र ही भरती शंभर टक्के पारदर्शक असावी यावर त्यांनी भर दिला. यापूर्वी IBPSमार्फत २५० पेक्षा जास्त कर्मचाऱ्यांची भरती झाली होती, तरी एकही तक्रार आली नाही. त्यामुळे पुढील काळातही शासनाकडे परवानगी मागितलेल्या ३०० जागांची भरती पारदर्शक एजन्सीमार्फतच करावी, अशी त्यांची मागणी आहे. “ही भरती फक्त गुणवत्तेनुसार (मेरिट) झाली पाहिजे; शिफारस, वशिलेबाजी किंवा पैसे घेऊन निवड खपवून घेतली जाणार नाही,” असे खडसे यांनी स्पष्ट केले.

गैरव्यवहार करणाऱ्यांवर कारवाईची मागणी

सचिवांकडून काही उमेदवारांकडून २०,००० रुपये मागितल्याच्या तक्रारी आपल्या कडे आल्या असल्याचे खडसे यांनी सांगितले. अशा गैरव्यवहारात सहभागी असणाऱ्यांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.

‘दगडी बँक’ ही वारसा व ओळख

खडसे म्हणाले, “दगडी बँक ही केवळ एक इमारत नसून जिल्हा बँकेची ओळख आणि वारसा आहे. पहिल्या चेअरमनपासून आजपर्यंत सर्व प्रमुख पदाधिकारी याच वास्तूतून कारभार पाहत आले आहेत. लाखो शेतकरी व खातेदार यांच्याशी या वास्तूच्या भावना जोडलेल्या आहेत.”

बँकेला विक्रीची निकड नाही

सध्या जिल्हा बँकेला दगडी बँक विकण्याची कोणतीही आर्थिक गरज नाही, असे सांगत खडसे यांनी NPA कमी करण्यासाठी धरणगाव तालुक्यातील बेकायदेशीर केळी लागवडीस दिलेली कर्जे वसूल करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असा सल्ला दिला.

शेवटी खडसे यांनी स्पष्ट केले की, “गैरव्यवहार आणि ऐतिहासिक मालमत्ता विक्रीचे चुकीचे निर्णय आम्ही सहन करणार नाही. हा निर्णय तातडीने मागे घ्यावा. अन्यथा शेतकऱ्यांना सोबत घेऊन ‘दगडी बँक बचाव’ मोहीम हाती घ्यावी लागेल.”

Post a Comment

Previous Post Next Post