मागील महिन्यातच खडसे यांच्या स्नुषा आणि मंत्री रक्षाताई खडसे यांच्या मुक्ताई नगर येथील पेट्रोल पंपावर झालेल्या दरोड्याची घटना ताजी असतानाच, आता थेट त्यांच्या जळगावमधील निवासस्थानी झालेल्या चोरीमुळे राजकीय नेत्यांची घरेसुद्धा सुरक्षित नसल्याचे दिसून आले आहे.
प्राप्त माहितीनुसार, एकनाथ खडसे हे बहुतांशी मुक्ताई नगर येथे वास्तव्यास असल्याने जळगावमधील शिवराम नगर येथील ‘मुक्ताई’ बंगल्याला काही दिवसांपासून कुलूप होते. आज सकाळी नेहमीप्रमाणे कर्मचारी बंगल्यावर आले असता, दाराचे कुलूप तुटलेले दिसले. घरात प्रवेश करून पाहणी केली असता, आतील सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळले. त्यानंतर चोरी झाल्याचे स्पष्ट झाले.
कर्मचारी यांनी तात्काळ खडसे यांना माहिती दिली. त्यानंतर त्यांनी पोलिसांना कळविले. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी तातडीने ‘मुक्ताई’ बंगल्याकडे धाव घेतली. घटनास्थळी पंचनामा सुरू असून पोलिसांचा तपास सुरू आहे.
एका प्रमुख राजकीय नेत्याच्या निवासस्थानी चोरी झाल्याने जळगाव शहराच्या कायदा व सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. या चोरीत नेमके किती नुकसान झाले आहे आणि कोणकोणत्या वस्तू चोरीला गेल्या आहेत, हे पोलिसांच्या तपासानंतरच स्पष्ट होणार आहे. दरम्यान, परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासून चोरांचा माग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------