खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - चोपडा शहर पोलिसांनी मध्यरात्री शिरपूर बायपास रोडवर धडक कारवाई करत रस्त्यावर दरोडा टाकण्याच्या तयारीत असलेल्या सात सराईत गुन्हेगारांच्या टोळीला जेरबंद केले आहे. ही कारवाई २७ ऑक्टोबर रोजी पहाटे साडेदोन वाजता करण्यात आली. पोलिसांनी आरोपींकडून दोन लोडेड गावठी कट्टे, दोन तलवारी, एक रिकामे मॅगझीन, रोख रक्कम, मोबाईल फोन आणि गुन्ह्यात वापरलेली स्विफ्ट डिझायर कार असा एकूण १३ लाख १० हजार रुपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. अटक आरोपींमध्ये नांदेड, वैजापूर (संभाजीनगर) आणि चोपडा येथील सराईत गुन्हेगारांचा समावेश आहे.
अशी केली कारवाई
पोलीस निरीक्षक मधुकर साळवे यांना मध्यरात्री गोपनीय माहिती मिळाली की, शिरपूर बायपास रोडवर पांढऱ्या रंगाची स्विफ्ट डिझायर (क्र. MH 26 CH 1733) संशयास्पदरीत्या उभी आहे. या गाडीत काही इसम बराच वेळ थांबलेले असल्याचे समजताच त्यांनी तात्काळ एक पथक तयार केले. रणगाडा चौकानंतर बायपासलगत ती कार दिसून आली. गाडीबाहेर दोन जण पाळत ठेवताना तर पाच जण आत बसलेले होते. पोलिसांची चाहूल लागताच सर्वांनी पळण्याचा प्रयत्न केला, मात्र सतर्क पथकाने घेराव घालून सातही जणांना पकडले.
आरोपी व जप्त शस्त्रे
झडतीदरम्यान दोघांच्या कंबरेत लोडेड गावठी कट्टे, तर गाडीत दोन तलवारी आणि एक रिकामे मॅगझीन आढळले. पोलिसांनी शस्त्रांसह मोबाईल, रोख रक्कम आणि गाडी असा १३.१० लाखांचा मुद्देमाल जप्त केला.
अटक आरोपींची नावे –
१. दिलीपसिंघ हरीसिंघ पवार (३२, रा. नांदेड)
२. विक्रम बाळासाहेब बोरगे (२४, रा. वैजापूर, जि. संभाजीनगर)
३. अनिकेत बालाजी सुर्यवंशी (२५, रा. नांदेड)
४. अमनदिपसिंघ अवतारसिंग राठोड (२५, रा. नांदेड)
५. सद्दामहुसेन मोहंम्मद अमीन (३३, रा. नांदेड)
६. अक्षय रविंद्र महाले (३०, रा. चोपडा)
७. जयेश राजेंद्र महाजन (३०, रा. चोपडा)
सराईत व धोकादायक आरोपी
सर्व आरोपी हे नामचीन गुन्हेगार असून, त्यांच्या विरोधात नांदेड, वैजापूर आणि चोपडा पोलीस ठाण्यांत खून, खुनाचा प्रयत्न, दरोडा, खंडणी, दंगल, आणि आर्म्स अॅक्टसह गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. आरोपी दिलीपसिंघ पवार याच्यावर खुनासह सात, अनिकेत सुर्यवंशीवर चौदा, तर विक्रम बोरगे हा वैजापूर येथील आर्म्स अॅक्ट गुन्ह्यात फरार होता. दोन आरोपी नुकतेच एमपीडीए (MPDA) स्थानबद्धतेतून सुटलेले आहेत. चोपड्याचा अक्षय महाले याच्यावरही अग्निशस्त्र बाळगणे आणि दंगलीचा गुन्हा आहे.
खंडणी वसुलीसाठी विवस्त्र करून छळ
प्राथमिक तपासात आरोपींची क्रूर गुन्हेगारी पद्धत समोर आली आहे. ते लोकांना शस्त्रांचा धाक दाखवून खंडणी वसूल करीत, अपहरण करून विवस्त्र छळ करीत आणि त्याचे व्हिडिओ बनवून धमकी देत असत. पोलिसांकडून या दिशेने पुढील तपास सुरू आहे.
या प्रकरणी सातही आरोपींविरुद्ध संगनमताने दरोड्याची तयारी व शस्त्र बाळगल्याप्रकरणी चोपडा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा रजि. क्र. ५८१/२०२५ अन्वये भादंवि कलम ३१०(४), ३१०(५), शस्त्र अधिनियम कलम ३/२५, ४/२५ आणि महाराष्ट्र पोलीस कायदा कलम १३५ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्व आरोपींना अटक करून न्यायालयात हजर करण्यात आले आहे.
कारवाईतील पथक
ही कारवाई पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षक कविता नेरकर, उपविभागीय अधिकारी अण्णासाहेब घोलप यांच्या मार्गदर्शनाखाली, पोलीस निरीक्षक मधुकर साळवे, सहाय्यक निरीक्षक एकनाथ भिसे, पोहेकों हर्षल पाटील, संतोष पारधी, ज्ञानेश्वर जवागे, अजिंक्य माळी, अमोल पवार, मदन पावरा, रविंद्र मेढे, विनोद पाटील, चालक किरण धनगर, योगेश पाटील आणि प्रकाश ठाकरे यांच्या पथकाने यशस्वीरीत्या पार पाडली. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक चेतन परदेशी करत आहेत.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------