खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शहरातील एमआयडीसी परिसरात ५ ऑक्टोबर रोजी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्याने दोन कंपन्यांमध्ये घुसून तब्बल २ लाख रुपयांची रोकड चोरून नेल्याची धक्कादायक घटना घडली. याप्रकरणी ६ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही घटना पहाटे सव्वा चारच्या सुमारास घडली. अज्ञात चोरट्याने प्रथम पूनम पेंट कंपनीच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला आणि तेथून सुमारे ३०,००० रुपयांची रोकड चोरून नेली. त्यानंतर काही वेळातच ई सेक्टरमधील छबी इलेक्ट्रीकल कंपनीतही अशीच दुसरी चोरी केली. या ठिकाणाहून १,७०,००० रुपयांची रोकड चोरट्याने लंपास केली.
सकाळी कामासाठी कंपन्यांमध्ये आलेल्या कर्मचाऱ्यांना चोरीचा प्रकार लक्षात आला. त्यांनी तात्काळ कंपनी व्यवस्थापकांना माहिती दिली. यानंतर पूनम पेंट कंपनीचे व्यवस्थापक विजय गोविंद वाघुळदे (वय ५४, रा. मुंदडा नगर) यांनी एमआयडीसी पोलिस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार नोंदवली.
तक्रारीच्या आधारे पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल केला असून, घटनास्थळाची बारकाईने पाहणी करण्यात आली आहे. तसेच परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्याचे काम सुरू असून, संशयिताचा शोध घेण्यासाठी गस्त वाढवण्यात आली आहे.
पोलिस नाईक प्रदीप चौधरी यांनी सांगितले की, “घटनेतील चोरट्याचा लवकरच माग काढण्यात येईल. परिसरातील सुरक्षिततेसाठी विशेष गस्त आणि उपाययोजना करण्यात येतील.”
दरम्यान, एमआयडीसी परिसरात अशा प्रकारच्या चोऱ्यांचे प्रमाण वाढत असल्याने उद्योजकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले आहे. याच पार्श्वभूमीवर उद्योजक संघटनेने पोलिस अधिकाऱ्यांची भेट घेऊन सुरक्षेच्या उपाययोजनांसंदर्भात तातडीने पावले उचलण्याची मागणी केली आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------