एसीबीची कारवाई; पारोळ्यातील महिला वनपाल आणि सॉ मिल मालकावर भ्रष्टाचाराचा गुन्हा

✒️ पराग काथार, खबर महाराष्ट्र न्यूज – शेतातील निबांची झाडे तोडून त्यांची वाहतूक बेकायदेशीर ठरवत पकडलेला ट्रक सोडण्यासाठी दोन लाख पन्नास हजार रुपयांची लाच मागून तडजोडीअंती एक लाख रुपये स्वीकारण्यास संमती दिल्याप्रकरणी पारोळा वन विभागातील एक महिला वनपाल, एक खाजगी सॉ मिल मालक आणि एका वन कर्मचाऱ्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही कारवाई लाचलुचपत प्रतिबंधक विभाग नाशिक/जळगाव यांनी केली आहे.

तक्रारदार यांच्या भावाने आपल्या शेतातील निबांची झाडे तोडून ती मालेगाव येथे नेण्यासाठी एका ट्रकमध्ये भरली होती. सदर ट्रक सावित्री फटाके फॅक्टरीसमोर आला असता, वनपाल श्रीमती वैशाली गायकवाड, एक वन कर्मचारी आणि श्रीकृष्ण सॉ मिलचे मालक सुनिल धोबी यांनी तो अडवला. वनपाल गायकवाड यांनी सदर ट्रक बेकायदेशीर लाकूड वाहतूक करत असल्याचे कारण सांगून १४ ऑक्टोबर २०२४ रोजी वाहन पकडले आणि ते पारोळा येथील श्रीकृष्ण सॉ मिल येथे ठेवले.

यानंतर तक्रारदार व त्यांच्या भावाने गायकवाड यांना व इतर वन कर्मचाऱ्यांना ट्रक सोडण्याची विनंती केली असता, सुरुवातीला दोन लाख पन्नास हजार रुपयांची मागणी करण्यात आली. नंतर तडजोडीनंतर एक लाख रुपयांवर व्यवहार ठरला आणि ही रक्कम खाजगी इसम सुनिल धोबी यांच्याकडे देण्यास सांगण्यात आले.

या प्रकरणाबाबत तक्रारदार यांनी १० डिसेंबर २०२४ रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली. त्याच दिवशी एसीबीच्या अधिकाऱ्यांनी पंचसाक्षीदारांच्या उपस्थितीत तक्रारीची पडताळणी केली. पडताळणीदरम्यान श्रीकृष्ण सॉ मिल, पारोळा येथे गायकवाड, वन कर्मचारी आणि सुनिल धोबी यांनी तक्रारदाराच्या भावाचा पकडलेला ट्रक व त्यातील मालावर कोणतीही कारवाई न करण्याच्या मोबदल्यात एक लाख रुपयांची मागणी केल्याचे निष्पन्न झाले.

या पडताळणीच्या आधारे २९ ऑक्टोबर २०२५ रोजी पारोळा पोलिस ठाण्यात गुन्हा रजिस्टर क्रमांक २६४/२०२५ अन्वये महिला वनपाल श्रीमती वैशाली गायकवाड, खाजगी इसम सुनिल धोबी आणि एका वन कर्मचाऱ्यावर भ्रष्टाचार प्रतिबंध अधिनियम १९८८ चे कलम ७, ७(अ) आणि १२ प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

ही कारवाई पोलीस उपअधीक्षक योगेश ठाकूर आणि पोलीस निरीक्षक नेहा तुषार सुर्यवंशी यांच्या पथकाने केली. पथकात सपोउपनि दिनेशसिंग पाटील, पोना राकेश दुसाणे, पोना बाळू मराठे (जळगाव), पोहवा विनोद चौधरी, चापोहवा परशुराम जाधव (नाशिक), पोहवा नरेंद्र पाटील आणि पोना सुभाष पावरा (नंदुरबार) यांचा समावेश होता.

ही कारवाई मा. पोलीस अधीक्षक भारत तांगडे, अपर पोलीस अधीक्षक माधव रेड्डी आणि सुनिल दोरगे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडली.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post