प्रेमप्रकरणाच्या संशयातून तरुणास बेदम मारहाण; वडिलांनाही केली मारहाण

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - प्रेमप्रकरणाच्या संशयावरून जळगाव तालुक्यातील रामदेववाडी गावात एका तरुणाला सहा जणांनी मिळून बेदम मारहाण केल्याची गंभीर घटना समोर आली आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात सहा संशयितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असून, पुढील तपास पोलीस करत आहेत.

प्राप्त माहितीनुसार, रामदेववाडी गावातील रहिवासी प्रदीप राठोड याच्यावर गावातील काही युवकांनी प्रेमसंबंध असल्याचा संशय घेतला. याच कारणावरून सोमवार, दिनांक ६ ऑक्टोबर रोजी रात्री ११ वाजताच्या सुमारास दुर्गा देवी मंडळाजवळील एका किराणा दुकानाजवळ प्रदीप राठोड याला कैलास विजय जाधव, विशाल अनिल जाधव, जीवन भंगराज जाधव, विवेक भंगराज जाधव, विकास धर्मसिंग जाधव आणि निलेश कैलास जाधव (सर्व राहिवासी रामदेववाडी) यांनी पकडून लाकडी काठ्यांनी व इतर साधनांनी बेदम मारहाण केली.

दरम्यान, आपल्या मुलाला मारहाण होत असल्याचे पाहून प्रदीपचे वडील विनोद राठोड यांनी प्रसंगात हस्तक्षेप करण्याचा प्रयत्न केला. मात्र, आरोपींनी त्यांनाही लाथा-बुक्क्यांनी आणि लाकडी काठ्यांनी मारहाण करत गंभीर जखमी केले. या हल्ल्यामुळे परिसरात तणावाचं वातावरण निर्माण झालं.

या घटनेनंतर, प्रदीप राठोड यांचे काका प्रविण राठोड यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेतली आणि तक्रार दाखल केली. त्यांच्या तक्रारीवरून वरील सहा संशयितांविरुद्ध गुन्हा नोंदवण्यात आला असून, पोलीस नाईक किरण पाटील पुढील तपास करीत आहेत.

या घटनेमुळे रामदेववाडी परिसरात भीतीचे आणि चिंतेचे वातावरण पसरले असून, स्थानिक नागरिकांनी दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post