जितेंद्र साळुंखे खून प्रकरणात स्थानिक गुन्हे शाखा व भुसावळ पोलिसांची समन्वयित कारवाई
खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जळगाव जिल्ह्यात सलग घडणाऱ्या खुनांच्या मालिकेत आणखी एक धक्कादायक घटना घडली आहे. भुसावळ तालुक्यातील कंडारी परिसरात रविवारी (दि. ५ ऑक्टोबर) रात्री सुमारास १० ते ११ वाजेच्या दरम्यान किरकोळ वादातून एका तरुणाचा धारदार शस्त्राने खून करण्यात आला. ही घटना समोर येताच जिल्हाभरात खळबळ उडाली असून पोलिसांनी अवघ्या काही तासांत सर्व आरोपींना अटक करून प्रकरणाचा पर्दाफाश केला आहे.
या घटनेत मृत झालेल्या तरुणाचे नाव जितेंद्र राजेंद्र साळुंखे (वय ४०, रा. गेंदालाल मिल परिसर, जळगाव) असे आहे. जितेंद्र हा हातमजुरी करून पत्नी आणि तीन मुलांसह आपला उदरनिर्वाह करीत होता. अत्यंत शांत आणि परिश्रमी स्वभावाचा हा व्यक्ती एका किरकोळ वादाचा बळी ठरल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, जितेंद्र हा जळगाव शहरातील तीन परिचित व्यक्तींसोबत भुसावळ तालुक्यातील कंडारी गावात एका वैयक्तिक कामानिमित्त गेला होता. रात्री उशिरा चौघेही एका हॉटेलवर बसून मद्यपान करत असताना किरकोळ कारणावरून त्यांच्यात वाद झाला. वाद काही क्षणांतच तीव्र चकमकीत परिवर्तित झाला आणि तिघा आरोपींनी मिळून जितेंद्रवर धारदार शस्त्राने वार केले.
जखमी अवस्थेत त्याला तातडीने भुसावळ येथील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले, मात्र डॉक्टरांनी तपासणीअंती त्याला मृत घोषित केले. घटनेची माहिती मिळताच भुसावळ पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा सुरू केला आणि आरोपींचा शोध घेण्यासाठी मोठी मोहीम हाती घेतली.
घटनेची माहिती मिळताच मा. डॉ. श्री महेश्वर रेड्डी (पोलीस अधीक्षक, जळगाव) यांनी मा. श्री राहुल गायकवाड (वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, जळगाव) यांना आरोपींचा तातडीने शोध घेण्याचे आदेश दिले.
स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक राहुल गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली एक विशेष पथक तयार करण्यात आले. या पथकात PSI गोरे, पोकॉ सिद्धेश डापकर, रतन गीते, सलीम तडवी, मयूर निकम, किशोर पाटील, उमाकांत पाटील, प्रशांत परदेशी, राहुल नरवाडे आणि शनिपेठ पोलिस स्टेशनचे कर्मचारी योगेश साबळे यांचा समावेश होता.
या पथकाने रात्रभर शोधमोहीम राबवून गोपनीय माहितीच्या आधारे जळगाव शहरातील शिवाजीनगर परिसरातून दोन आरोपींना अटक करण्यात यश मिळवले.
स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अटक केलेले आरोपी पुढीलप्रमाणे आहेत –
1️⃣ राजू उर्फ बाबू अशरक सपकाळे (वय ३८, रा. कांती चौक, शिवाजी नगर, जळगाव)
2️⃣ मयूर उर्फ विक्की दिपक अलोने (वय ३२, रा. बारसे नगर, शिवाजी नगर, जळगाव) दोन्ही आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले असून, प्राथमिक चौकशीत त्यांनी गुन्ह्याची कबुली दिल्याचे समजते.
दरम्यान, भुसावळ शहर पोलीस निरीक्षक उद्धव डमाळे यांनी स्वतंत्र पथक तयार करून तिसऱ्या आरोपीचा शोध सुरू ठेवला. त्यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने तपासाची दिशा बदलत निर्णायक हालचाल केली आणि दीपक वसंत शंखपाळ (रा. कंडारी, ता. भुसावळ) या तिसऱ्या आरोपीला अटक करण्यात यश मिळवले.
या संपूर्ण कारवाईत भुसावळ शहर पोलीस ठाण्याचे अधिकारी आणि कर्मचारी यांनीही महत्त्वाची भूमिका बजावली. पोलिसांच्या जलद आणि समन्वयित कारवाईमुळे अवघ्या काही तासांत प्रकरण उघडकीस आल्याने नागरिकांकडून पोलिस दलाचे कौतुक व्यक्त केले जात आहे.
या प्रकरणाचा पुढील तपास भुसावळ पोलिस ठाण्याचे अधिकारी करत असून, घटनामागील नेमके कारण आणि आरोपींच्या संबंधातील अधिक तपशील समोर येण्याची शक्यता आहे.
Tags
जळगाव