ब्रेकींग I ओटीपी न देता लिंक न क्लिक करताही ट्रान्सपोर्ट व्यावसायिकाची ३.६६ लाखांची सायबर फसवणूक

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - शहरातील नेहरूनगर येथे वास्तव्यास असलेले व ट्रान्सपोर्ट व्यवसायाशी संबंधित मांगीलाल बनवारीलाल पारिक (वय ६५), यांची तब्बल तीन लाख ६६ हजार ८९३ रुपयांची फसवणूक करण्यात आली. विशेष म्हणजे, ही रक्कम कोणतीही लिंक क्लिक न करता वा ओटीपी शेअर न करता त्यांच्या खात्यातून परस्पर काढली गेली. त्यामुळे नागरिकांमध्ये आणि सायबर तज्ज्ञांमध्येही आश्चर्य व्यक्त केले जात आहे.

ही घटना दि. २९ सप्टेंबर रोजी घडली असून, ३ ऑक्टोबर रोजी एमआयडीसी पोलिस ठाण्यात अज्ञात व्यक्तीविरोधात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस हवालदार सचिन पाटील करत आहेत.

पाच वेळा परस्पर पैसे ट्रान्सफर

पारिक यांचा ‘पूजा रोड कॅरियर’ नावाचा ट्रान्सपोर्ट व्यवसाय ट्रान्सपोर्ट नगर भागात आहे. त्यांचे एका खासगी बँकेत खाते असून, दि. २९ सप्टेंबर रोजी त्यांच्या मोबाईलवर ९९ हजार ८०० रुपये काढल्याचा मेसेज आला. त्यांनी तात्काळ आपल्या मुलाला याबाबत विचारणा केली असता, त्याने कोणताही व्यवहार न केल्याचे सांगितले.

यानंतर काही वेळात एकामागून एक पाच वेगवेगळ्या ट्रान्सॅक्शन्सद्वारे एकूण ३,६६,८९३ रुपये त्यांच्या खात्यातून काढल्याचे मेसेज आले. मेसेज पाहताच पारिक यांनी तातडीने संबंधित बँक शाखेत धाव घेतली. मात्र, शाखा व्यवस्थापकाने ही रक्कम नेमकी कोठे वर्ग झाली, हे सांगता येणार नसल्याचे स्पष्ट केले.

सायबर गुन्हेगारीची नवी पद्धत?

या प्रकारात ना कोणतीही लिंक क्लिक करण्यात आली, ना कोणताही ओटीपी शेअर करण्यात आला, तरीही बँक खात्यातून मोठ्या प्रमाणात रक्कम काढली गेली. त्यामुळे ही सायबर फसवणुकीची नवीन आणि अधिक धोकादायक पद्धत असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.

पोलिसांनी अज्ञात व्यक्तीविरोधात गुन्हा दाखल करून सायबर विभागाच्या मदतीने तपास सुरू केला आहे. सायबर सुरक्षेच्या दृष्टीने ही घटना इतर नागरिकांसाठीही धोक्याची घंटा ठरू शकते.

नागरिकांनी काय काळजी घ्यावी?

अनोळखी अ‍ॅप्स/सॉफ्टवेअर मोबाईलमध्ये डाउनलोड करू नये.

बँकेच्या अधिकृत अ‍ॅप्लिकेशनशिवाय इतर कोणतीही ऍप्लिकेशन्स वापरू नयेत.

खात्यावर संशयास्पद हालचाल जाणवल्यास त्वरित बँकेशी व पोलिसांशी संपर्क साधावा.

मोबाईल व बँक अ‍ॅप्लिकेशनसाठी मजबूत पासवर्ड/पिन वापरावा.

Post a Comment

Previous Post Next Post