देवी विसर्जनात काळाची चाहूल; जळगावात १९ वर्षीय तरुण गिरणा नदीत बुडाला

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - गिरणा नदी पात्रात देवी विसर्जन करत असताना तोल जाऊन पाण्यात पडल्याने हितेश संतोष पाटील (वय १९, रा. दादावाडी) या युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना शुक्रवारी (दि. ३ ऑक्टोबर) दुपारी १२:३० वाजेच्या सुमारास बांभोरी गावाजवळ घडली.

हितेश आपल्या मित्रांसह देवी विसर्जनासाठी बांभोरी गावाजवळील सुरत रेल्वे पुलाजवळ गिरणा नदीपात्रात गेला होता. देवीची मूर्ती विसर्जित करत असताना अचानक त्याचा तोल गेला आणि तो नदीच्या प्रवाहात वाहून गेला.

विशेष म्हणजे, देवी विसर्जनाच्या या घटनेचे मोबाईलद्वारे त्याचे मित्र चित्रण करत होते. त्याचवेळी हा दुर्दैवी अपघात घडला आणि हितेश पाण्यात बुडून गेला. डोळ्यांसमोर मित्राला वाहून जाताना पाहून त्यांनी लगेचच हितेशचा भाऊ हिमेश पाटील याला घटनेची माहिती दिली.

घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबीयांसह दादावाडी व बांभोरी परिसरातील नागरिक घटनास्थळी धावले. महापालिकेच्या अग्निशमन विभागाच्या जवानांनी तातडीने शोधमोहीम सुरू केली. मात्र संध्याकाळपर्यंत हितेशचा काहीही थांगपत्ता लागला नाही. त्यामुळे सायंकाळी बचावकार्य थांबविण्यात आले.

ही घटना अत्यंत हृदयद्रावक असून देवी विसर्जनाचा आनंद काही क्षणांतच शोकांतिका ठरला. स्थानिक प्रशासनाकडून पुढील शोधकार्य पुन्हा सुरू करण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post