खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जळगाव शहरातील आकाशवाणी चौकापासून ते महाबळ चौकापर्यंतच्या प्रमुख रस्त्यांवर अतिक्रमणाने विक्राळ स्वरूप धारण केले असून, यामुळे वाहतूक व्यवस्थेचा संपूर्ण बोजवारा उडालेला आहे. अतिक्रमणाच्या वाढत्या विळख्यामुळे नागरिकांना दररोज प्रचंड त्रास सहन करावा लागत असून, रस्त्याच्या दुतर्फा सकाळी व संध्याकाळच्या गर्दीच्या वेळात पायी चालणेही कठीण झाले आहे.
या रस्त्यावर फळविक्रेते, भाजीपाला विक्रेते, वडापाव आणि पाणीपुरी गाड्या, तसेच रसवंती गृहांनी रस्त्याच्या कडेने बिनधास्त अतिक्रमण केले असून, अनेक ठिकाणी रस्ता अर्ध्यापर्यंत व्यापला जात आहे. परिणामी, वाहतुकीला अडथळा निर्माण होत असून, अपघातांची शक्यता वाढली आहे. खालील ठिकाणी अतिक्रमण अत्यंत गंभीर स्वरूपात वाढलेले दिसून येत आहे. सागर पार्क समोर पेट्रोल पंपाजवळ, अल्पबचत भवनसमोर, DYSP निवासस्थान, भाऊंचे उद्यान, हतनूर कॉलनी परिसर, पशु वैद्यकीय दवाखान्याजवळ, या सर्व ठिकाणी रस्ते अरुंद असून, अतिक्रमणामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. काव्यरत्नावली चौकात गेल्या काही महिन्यांपासून भर चौकात भाजीपाला विक्रेते बसत असून, त्यामुळे वाहतूक कोंडी तर होतेच, पण रहदारीत प्रचंड गैरसोय निर्माण होते आहे. या प्रकारांकडे संबंधित यंत्रणांचे दुर्लक्ष होत असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. काही अतिक्रमण धारकांना स्थानिक कर्मचाऱ्यांचे ‘अप्रत्यक्ष पाठबळ’ मिळत असल्याचीही चर्चा जनतेमध्ये सुरू आहे, ज्यामुळे प्रशासनाबद्दल नाराजी व्यक्त केली जात आहे.
उल्लेखनीय बाब म्हणजे, या मार्गावर जिल्हाधिकारी कार्यालय, जिल्हा न्यायालय, जिल्हा पोलिस अधीक्षकांचे कार्यालय तसेच आर.टी.ओ. कार्यालय आहे. अशा महत्त्वाच्या प्रशासकीय संस्थांच्या परिसरात अतिक्रमण असल्याने जिल्हा प्रशासनाची प्रतिमा धक्कादायकरीत्या धुसर होत चालली आहे. यासंदर्भात नागरिकांनी आयुक्तांना निवेदन सादर करून तात्काळ अतिक्रमण हटवण्याची आणि कायमस्वरूपी बंदोबस्त करण्याची मागणी केली आहे. प्रशासनाने या गंभीर समस्येकडे गांभीर्याने लक्ष देऊन योग्य ती कारवाई करावी, अशी सर्वसामान्यांची अपेक्षा आहे.
Tags
जळगाव