खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - शहरातील मोहाडी रोडलगत नेहरू नगर परिसरातील बालाजी हाइट्स या इमारतीत भरदिवसा घडलेल्या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली आहे. आश्चर्य म्हणजे, चोरीचा प्रयत्न करणारा व्यक्ती हा इमारतीतच वॉचमन म्हणून काम करत होता. त्याने एका महिलेच्या घरात घुसून गळ्यातील सोन्याची पोत हिसकावण्याचा प्रयत्न केला, मात्र महिलेच्या धाडसामुळे तो अखेर पकडला गेला.
घटनेचे वृत्त असे की, नेहरू नगर येथील बालाजी हाइट्स अपार्टमेंटच्या तिसऱ्या मजल्यावर राहणाऱ्या महिलेच्या घराचे दार ठोठावत हा वॉचमन घरात शिरला. त्याने पाणी मागण्याचे कारण सांगून महिलेची दिशाभूल केली. पाणी आणण्यासाठी वळताच, त्याने अचानक महिलेच्या गळ्यातील मंगळसूत्र पकडण्याचा प्रयत्न केला. प्रसंगावधान राखत महिलेने त्याला धरून ठेवले.
तेव्हा वॉचमनने चाकू काढून महिलेच्या हातावर वार केला, ज्यामुळे ती जखमी झाली. तरीदेखील धाडसी महिलेने त्याला तिसऱ्या मजल्यावरून ओढत खाली आणले आणि मोठ्याने आरडाओरडा करत शेजाऱ्यांना बोलावले. आवाज ऐकून नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत आरोपी वॉचमनला पकडले. संतप्त नागरिकांनी त्याला चांगलाच चोप देऊन एमआयडीसी पोलिसांच्या ताब्यात दिले.
या घटनेमुळे परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला आहे. या प्रकरणी एमआयडीसी पोलिस ठाण्यात वॉचमनविरुद्ध गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
परिसरातील नागरिकांनी त्या महिलेच्या धाडसाचे कौतुक केले असून, पोलिसांनी आरोपी वॉचमनकडून सविस्तर चौकशी सुरू केली आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
चोरी