धावत्या ट्रेनमधून २.३ किलो सोन्याची बॅग चोरी; जळगावच्या सराफा व्यापाऱ्याला लाखोंचा फटका; बडनेरा स्टेशनवर घडली धक्कादायक घटना; जीआरपीकडून तपास सुरू, सराफा बाजारात खळबळ


खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - धावत्या ट्रेनमधून तब्बल २ किलो ३०० ग्रॅम सोन्याची बॅग चोरी झाल्याची थरारक घटना अमरावती शहरात घडली आहे. ही घटना रविवारी सायंकाळी सुमारे नऊच्या सुमारास बडनेरा रेल्वे स्टेशनवर घडली. या प्रकरणामुळे सराफा व्यापाऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, रेल्वे पोलिसांनी सखोल तपास सुरू केला आहे. विशेष म्हणजे चोरी झालेला व्यापारी जळगाव येथील असल्याचे समजते.

मिळालेल्या माहितीनुसार, जळगावातील सराफा व्यावसायिक किशोर वर्मा हे दिवाळीपूर्वी अमरावतीतील स्थानिक सराफा व्यापाऱ्यांना दागिने व सोने माल दाखवण्यासाठी आले होते. संपूर्ण दिवस व्यवसायिक व्यवहार केल्यानंतर ते परतीसाठी हावडा-मुंबई मेल या ट्रेनने जळगावकडे निघाले. रेल्वे स्टेशनवरून ट्रेन सुटताच गर्दीचा फायदा घेत अज्ञात व्यक्तीने त्यांच्या हातातील सुमारे २.३० किलो सोन्याची बॅग चोरून नेली.

घटनेनंतर व्यापाऱ्यांनी तात्काळ जीआरपी पोलिसांकडे धाव घेत तक्रार नोंदवली. त्यानंतर पोलिसांनी स्टेशन परिसरातील सीसीटीव्ही फुटेज तपासण्यास सुरुवात केली आहे. मात्र अद्याप आरोपीचा ठावठिकाणा लागलेला नाही. पोलिसांच्या मते, ही चोरी अत्यंत नियोजनबद्ध आणि धाडसी पद्धतीने करण्यात आली असून, धावत्या ट्रेनमध्ये अशी घटना घडणे दुर्मीळ मानले जाते.
या घटनेनंतर जळगाव व अमरावती सराफा बाजारात मोठी खळबळ उडाली आहे. दिवाळीचा हंगाम असल्याने मोठ्या प्रमाणात सोने-चांदी व्यवहार सुरू आहेत. त्यामुळे अशी घटना घडल्याने व्यापाऱ्यांमध्ये भीती व संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. जीआरपीकडून या प्रकरणी विशेष पथक तयार करून चोरट्यांचा मागोवा घेण्यासाठी तांत्रिक साधनांचा वापर सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post