जळगाव (प्रतिनिधी):
शहराचे आ. राजूमामा भोळे यांच्या पुढाकाराने "झेंडूचं फुल" या अस्सल लेवा गणबोली भाषेतील नाटकाचा प्रयोग छत्रपती संभाजीराजे नाट्यगृहात सलग दोन दिवस सादर करण्यात आला. हसता हसता गंभीर सामाजिक संदेश देणाऱ्या या नाटकाला जळगावकरांचा प्रचंड प्रतिसाद लाभला. दोन्ही दिवस सभागृह हाऊसफुल्ल होते, आणि प्रेक्षकांनी नाटकाच्या सादरीकरणाचे भरभरून कौतुक केले.
स्नेहयात्री प्रतिष्ठान निर्मित, आणि वीरेंद्र पाटील लिखित व दिग्दर्शित "झेंडूचं फुल" या नाटकाने शेतकऱ्यांच्या जीवनातील संघर्ष आणि त्यांचे समाजासाठीचे योगदान याचे प्रभावी चित्रण केले आहे. नाटकाला राज्यशासनासह विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले आहे. ७ कलाकारांच्या उत्कृष्ट अभिनयाने शेतकऱ्यांच्या कष्टांचे वास्तववादी दर्शन घडवले.
कार्यक्रमाच्या प्रारंभी कलाकार आणि तंत्रज्ञांचा सन्मान खा. स्मिता वाघ, आ. राजूमामा भोळे, माजी महापौर सीमा भोळे, माजी नगरसेविका रंजना वानखेडे, गायत्री राणे, राजू मराठे, विजय वानखेडे, आणि दीप्ती चिरमाडे यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी खा. स्मिता वाघ यांनी आपल्या मनोगतातून शेतकऱ्यांच्या कष्टांचे ऋण फेडण्याचे आवाहन केले, तर आ. भोळे यांनी युवकांना शेतीकडे वळण्याचा सल्ला दिला.
आ. भोळे म्हणाले, "शेतकरी राजा हा देशाचा पोशिंदा आहे. आधुनिक तंत्रज्ञानाच्या मदतीने शेतीतून अधिक उत्पन्न मिळवता येते. शेतीला संजीवनी देणे हे आपले कर्तव्य आहे."
या दोन दिवसांच्या प्रयोगांमुळे नाटकाने प्रेक्षकांच्या मनावर ठसा उमटवला असून, पुढील काळातही अशा नाट्यकृतींना जळगावकरांनी उधाणून प्रतिसाद देण्याचे आश्वासन दिले.
-------------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
-----------------------------------
पराग काथार मुख्य संपादक
+918149343743
-----------------------------------