✒️ पराग काथार, खबर महाराष्ट्र न्यूज – पाचोरा तालुक्यातील लोहारा येथील व्यावसायिक चंद्रकांत पाटील यांना रिव्हॉल्वर दाखवून धमकावून ब्लॅकमेल केल्याप्रकरणी एका व्यक्तीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकारामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, ३० ऑक्टोबर रोजी रात्री सुमारे आठच्या सुमारास चंद्रकांत पाटील यांना एका अनोळखी व्यक्तीकडून फोन आला. संबंधित व्यक्तीने “तुमची प्लॉटिंग साईट दाखवा” अशी मागणी केली. त्यावर पाटील यांनी “उद्या दाखवतो” असे सांगितले असता, त्या व्यक्तीने “आता रोडवरून तरी दाखवा” असा आग्रह धरला.
यानंतर पाटील हे साईट दाखविण्यासाठी पाचोरा रोडवरील एका पेट्रोल पंपाजवळ गेले. तेथे आलेल्या व्यक्तीने अचानक रिव्हॉल्वर दाखवत त्यांना धमकावले. “एका विवाहित महिलेला तिच्या नवऱ्यापासून वेगळं होण्यासाठी सांग, अन्यथा तुझा गेम करून टाकू,” अशी धमकी त्याने दिली. या घटनेमुळे पाटील यांना जीव मुठीत धरावा लागला.
धमकीनंतर संबंधित व्यक्तीने पाटील यांना ब्लॅकमेल करीत पैशांची मागणी केली. भीतीपोटी पाटील यांनी ऑनलाइन दोन हजार रुपये पाठवले. याप्रकरणी अधिक चौकशी केल्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी पिंपळगाव (हरे) पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली.
फिर्यादीवरून चेतन गोपाळ पाटील (रा. अकलूद, ता. यावल) याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी घटनेचा पुढील तपास सुरू केला असून, आरोपीचा शोध घेतला जात आहे.
या धक्कादायक घटनेमुळे व्यापारी वर्गामध्ये भयाचे वातावरण निर्माण झाले आहे. ग्रामीण भागात अशा प्रकारच्या धमकी व ब्लॅकमेलिंगच्या घटना वाढत असल्याने पोलिसांनी तातडीने कारवाई करून आरोपीला अटक करण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------