यावेळी जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, गोदावरी फाउंडेशनच्या डॉ. केतकी पाटील, तहसीलदार नीता लबडे, सह-जिल्हा शल्यचिकित्सक आकाश चौधरी, तसेच गोदावरी हॉस्पिटलचे डॉक्टर आणि पदाधिकारी उपस्थित होते.
जखमींच्या आरोग्याविषयी आस्थेने चौकशी
दुर्घटनेत जखमी झालेल्यांवर पाचोरा येथील वृंदावन हॉस्पिटल व विघ्नहर्ता रुग्णालयात तातडीने उपचार करण्यात आले. त्यानंतर सर्व नऊ जखमींना अधिक उपचारासाठी गोदावरी हॉस्पिटलमध्ये हलवण्यात आले. जखमींच्या प्रकृतीत सुधारणा होत असून, त्यांची संपूर्ण काळजी घेतली जात असल्याची माहिती डॉ. केतकी पाटील यांनी मंत्री महोदयांना दिली.
जिल्हाधिकाऱ्यांकडून दुर्घटनेचा आढावा
जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी मंत्री रक्षा खडसे यांना रेल्वे दुर्घटनेची सविस्तर माहिती दिली. त्यांनी घटनास्थळी करण्यात आलेल्या तातडीच्या उपाययोजनांचा आणि मदतीच्या कार्याचा अहवाल सादर केला.
रक्षा खडसे झाल्या भावुक
दुर्घटनेतील जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयांशी संवाद साधताना रक्षा खडसे भावुक झाल्या. त्यांनी मृतांच्या कुटुंबीयांप्रती सहवेदना व्यक्त करत, "ही घटना दुर्दैवी असून, केंद्र आणि राज्य शासन जखमींना सर्वोतोपरी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे," असे स्पष्ट केले.
संपूर्ण सहकार्याचे आश्वासन
रक्षा खडसे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना जखमींच्या उपचारासाठी सर्व आवश्यक सुविधा तत्काळ उपलब्ध करून देण्याचे निर्देश दिले. तसेच, भविष्यात अशा दुर्घटनांचे प्रमाण कमी करण्यासाठी सुरक्षा उपाय अधिक बळकट करण्याचे निर्देश दिले.
जनतेकडून मंत्री महोदयांचे कौतुक
रक्षा खडसे यांच्या संवेदनशीलतेने जखमी आणि त्यांच्या कुटुंबीयांना मोठा दिलासा मिळाला. त्यांच्या तातडीच्या भेटीबद्दल उपस्थित नागरिकांनी मंत्री महोदयांचे आभार मानले.