खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव जिल्ह्यातील परधाडे रेल्वे स्थानकाजवळ बुधवारी (२२ जानेवारी २०२५) दुपारी एक भीषण रेल्वे अपघात घडला. मुंबईकडे जाणाऱ्या पुष्पक एक्स्प्रेसने अचानक ब्रेक लावल्यानंतर चाकांजवळ घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या उडाल्या, ज्यामुळे काही प्रवाशांना डब्यात आग लागल्याची भीती वाटली. या भीतीमुळे काही प्रवाशांनी गाडीतून उड्या मारल्या. दुर्दैवाने, त्याच वेळी शेजारील ट्रॅकवरून समोरून येणाऱ्या कर्नाटक एक्स्प्रेसने या प्रवाशांना धडक दिली, ज्यामुळे ११ प्रवाशांचा मृत्यू झाला आणि ४० हून अधिक प्रवासी जखमी झाले.
प्रत्यक्षदर्शी बाबा जाधव यांच्या मते, परधाडे स्टेशनच्या आधी ट्रेनचा ब्रेक लागल्याने घर्षणामुळे आगीच्या ठिणग्या उडाल्या. त्यावेळी प्रवाशांनी "आग लागली" असा आरडाओरडा केला आणि घाबरून उड्या मारायला सुरुवात केली. त्यामध्ये अनेकजण कर्नाटक एक्स्प्रेसच्या खाली आले.
जळगावचे जिल्हाधिकारी यांनी सांगितले की, या अपघातात ११ लोकांचा मृत्यू झाला आहे. रेल्वे प्रशासनाच्या मदतीने बचावकार्य सुरू असून, जखमींवर रुग्णालयात उपचार केले जात आहेत.
या दुर्दैवी घटनेनंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले, "जळगाव जिल्ह्यातील पाचोरानजीक एका अत्यंत दुर्दैवी घटनेत काही लोकांचा मृत्यू झाल्याची घटना अतिशय वेदनादायी आहे. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो." तसेच, मदतकार्य लवकरात लवकर पोहोचवण्याचे निर्देश दिले आहेत.
या घटनेनंतर रेल्वे प्रशासनाने प्रवाशांना अफवांवर विश्वास न ठेवण्याचे आणि आपत्कालीन परिस्थितीत शांत राहण्याचे आवाहन केले आहे, जेणेकरून अशा दुर्घटनांना टाळता येईल.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------