खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव जिल्ह्यात रस्ते अपघातांचे प्रमाण वाढत असून, शनिवारी २५ जानेवारी रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास झालेल्या एका भीषण अपघातात एक तरुण ठार झाला असून तीन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा अपघात जळगाव शहरातील दूध फेडरेशनजवळील भाग्यश्री पेट्रोल पंपाजवळ घडला.
मृत तरुणाचे नाव अंकुश आत्माराम भिल (वय २७, रा. डिकसाई, जळगाव) असे असून, जखमींमध्ये सुनील मधुकर भिल (वय २२), गणेश भगीरथ भिल (वय १८) आणि शुभम सुखा भिल (वय २०) यांचा समावेश आहे. हे तिघेही इदगाव, ता. जळगाव येथील रहिवासी आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, ट्रॅक्टर क्रमांक एमएच १९ एएन २९०६ विटा घेऊन जात असताना, वळणावर मागून आलेल्या डंपरने ओव्हरटेक करताना ट्रॅक्टरला कट मारला. या अचानक झालेल्या धडकेमुळे ट्रॅक्टर पलटी झाला आणि त्यावर बसलेला अंकुश भिल हा खाली पडून ट्रॅक्टरखाली दाबला गेला. या धडकेत त्याचा जागीच मृत्यू झाला.
त्याचवेळी ट्रॅक्टरवरील अन्य तीन तरुण गंभीर जखमी झाले. जखमींना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.
नागरिकांची मदत व पोलिसांची कारवाई:
घटनास्थळावर जमलेल्या नागरिकांनी मदतकार्य सुरू करत पोलिसांना माहिती दिली. माहिती मिळताच जळगाव शहर पोलीस ठाण्याचे कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी डंपर ताब्यात घेतले असून या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.
मृत तरुणाच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर:
मयत अंकुश भिल यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, दोन मुले आणि एक मुलगी असा परिवार आहे. या अपघातामुळे संपूर्ण कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
जळगाव शहरातील वाढत्या अपघातांवर प्रशासनाने लक्ष देण्याची आवश्यकता असून, नागरिकांनीही वाहतूक नियमांचे पालन करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
अपघात