जळगावमध्ये ‘गिलियन बॅरे सिंड्रोम’चा पहिला रुग्ण आढळला; आरोग्य प्रशासन सतर्क

खबर महाराष्ट्र न्युज, जळगाव: राज्यभरात पहिल्यांदाच गिलियन बॅरे सिंड्रोम (जीबीएस) या आजाराचा रुग्ण जळगाव तालुक्यात आढळला आहे. विशेष म्हणजे, 45 वर्षीय महिलेची कुठलीही ‘ट्रॅव्हल हिस्ट्री’ नसतानाही हा आजार झाल्याचे निष्पन्न झाले आहे. सद्यस्थितीत त्या महिलेवर शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत.

अचानक वाढले त्रासदायक लक्षणे
जळगाव तालुक्यातील एका रहिवासी महिलेला काही दिवसांपासून अशक्तपणा, अंगदुखी, खांदे दुखणे, पाठ दुखणे आणि अचानक चालण्यास व बसण्यास त्रास होणे अशी लक्षणे जाणवू लागली. प्रकृती खालावत चालल्याने कुटुंबीयांनी तिला तातडीने 30 जानेवारी रोजी संध्याकाळी 5 वाजता शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले. सध्या तज्ज्ञ डॉक्टरांच्या देखरेखीखाली तिच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.

‘ट्रॅव्हल हिस्ट्री’ नसतानाही संसर्ग
या महिलेला कुठल्याही गावाला जाण्याचा अनुभव नव्हता. त्यामुळे तिच्या संसर्गाचा प्राथमिक स्रोत काय आहे, हे शोधण्याचे काम सुरू आहे. मात्र, कुटुंबीयांनी वेळीच दवाखान्यात आणल्यामुळे परिस्थिती नियंत्रणात आहे. तज्ज्ञ डॉक्टर डॉ. गोपाल घोलप आणि डॉ. अभिजित पिल्लई यांच्या मार्गदर्शनाखाली महिलेवर उपचार सुरू आहेत.

जिल्हा प्रशासन सतर्क; आरोग्य विभागाची तयारी
जिल्ह्यात अशा आजारांना प्रतिबंध घालण्यासाठी आणि तळागाळातील नागरिकांपर्यंत आरोग्य सेवा पोहोचवण्यासाठी जिल्हा प्रशासनाने विशेष कार्यशाळा आयोजित केली. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांनी यावेळी बोलताना, "आरोग्य यंत्रणांनी ठोस कृती आराखडा तयार करून संसर्ग रोखण्यासाठी प्रभावी उपाययोजना कराव्यात," असे सांगितले.

कार्यशाळेला जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सचिन भायेकर, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. गिरीश ठाकूर, अतिरिक्त जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. जयवंत मोरे, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किरण पाटील उपस्थित होते. जिल्ह्यातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी औषधसाठा पुरेसा असल्याचे प्रशासनाने स्पष्ट केले.

जीबीएस टाळण्यासाठी घ्यावयाच्या उपाययोजना
गिलियन बॅरे सिंड्रोम हा प्रामुख्याने शरीराच्या रोगप्रतिकारशक्तीवर परिणाम करणारा आजार असून त्याचे लक्षणे ओळखून वेळीच उपचार घेतल्यास रुग्ण लवकर बरा होऊ शकतो.

लक्षणे:

अचानक हात-पायातील कमजोरी किंवा लकवा

चालताना अचानकपणे त्रास होणे

अंगदुखी आणि अशक्तपणा

काही रुग्णांमध्ये डायरियासारखी लक्षणे


सावधगिरी:

शुद्ध आणि उकळलेले पाणी प्यावे

स्वच्छता राखावी व ताजे अन्न सेवन करावे

शिजवलेले आणि न शिजवलेले अन्न वेगळे ठेवावे

रोगप्रतिकारशक्ती वाढविण्यासाठी संतुलित आहार घ्यावा


नागरिकांनी घाबरू नये – तज्ज्ञ डॉक्टरांचे आवाहन
तज्ज्ञांच्या मते, गिलियन बॅरे सिंड्रोमचे बहुतांश रुग्ण योग्य वेळी उपचार घेतल्यास पूर्णपणे बरे होतात. राज्यात अत्यंत कमी रुग्णांना व्हेंटिलेटरची गरज पडते. त्यामुळे नागरिकांनी घाबरून न जाता स्वच्छतेकडे लक्ष द्यावे आणि संसर्गजन्य आजार टाळण्यासाठी योग्य ती काळजी घ्यावी.

----------------------------------

आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------


Post a Comment

Previous Post Next Post