खबर महाराष्ट्र न्युज, जळगाव (प्रतिनिधी) : हर्बललाईफ कंपनीत गुंतवणुकीवर भरघोस परतावा मिळवून देण्याचे आमिष दाखवून अहिल्या नगर येथील एका ३१ वर्षीय महिलेची तब्बल ६६ लाख ४० हजार ५ रुपये इतक्या रकमेची फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी जळगाव येथील पाच जणांविरोधात रामानंदनगर पोलीस स्टेशन येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
गुंतवणुकीच्या आमिषाने लाखोंचा गंडा
फिर्यादी माधुरी अनिल चांदोरीकर (वय ३१, रा. रासने नगर, सावेडी, अहिल्या नगर) यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, जळगाव येथील हॉटेल चाय शाय बार येथे दि. ३१ जुलै २०२३ ते १ मार्च २०२५ या कालावधीत आरोपींनी गुंतवणुकीसाठी आमिष दाखवले. संशयित आरोपींमध्ये आशा कमलेश रूपाणी, कमलेश हेमचंद्र रूपाणी, दीपेश कमलेश रूपाणी, आश्लेष कमलेश रूपाणी (सर्व रा. खामगाव, जि. बुलढाणा; सध्या रा. पर्पल व्ह्यू अपार्टमेंट, शिवम कॉलनी, जळगाव) आणि आकाश सिद्धू वर्मा (वय ३२) यांचा समावेश आहे.
गुंतवणुकीचा सापळा आणि मोठा आर्थिक फटका
संशयितांनी फिर्यादी यांना हर्बललाईफ कंपनीत मोठ्या परताव्याचे आमिष दाखवून गुंतवणुकीस प्रवृत्त केले. त्यामुळे फिर्यादीने पती आणि नातेवाईकांसह मिळून ८६ लाख ६४ हजार ९९९ रुपये या आरोपींच्या बँक खात्यात, सीडीएम मशीनद्वारे आणि रोख स्वरूपात दिले. प्रारंभी फिर्यादींना २० लाख २४ हजार ९९४ रुपये परतावा म्हणून देण्यात आला. मात्र, उर्वरित ६६ लाख ४० हजार ५ रुपये परतावा मागितल्यावर आरोपींनी टाळाटाळ सुरू केली. अखेर फसवणूक झाल्याचे लक्षात आल्याने माधुरी चांदोरीकर यांनी पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली.
पोलिसांचा तपास सुरू; जळगावात खळबळ
या प्रकरणी रामानंदनगर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला असून, तपास पोलीस उपनिरीक्षक प्रदीप बोरुडे हे निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत. एवढ्या मोठ्या रकमेची फसवणूक झाल्याने जळगाव शहरात खळबळ उडाली आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
फसवणूक