खबर महाराष्ट्र न्युज, प्रतिनिधी | जळगाव : मानव सेवा विद्यालयातील उपक्रमशील कलाशिक्षक, चित्रकार आणि पर्यावरण मित्र सुनिल दाभाडे यांनी अनोख्या पद्धतीने गुढीपाडवा साजरा करत पुस्तकांची गुढी उभारली. या अभिनव संकल्पनेद्वारे त्यांनी विद्यार्थ्यांना वाचनाचे महत्त्व पटवून देण्याचा प्रयत्न केला आहे.
सध्याच्या डिजिटल युगात विद्यार्थ्यांच्या हातात मोबाईल फोन असल्याने पुस्तके वाचनातून हद्दपार होत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा वाचनाकडे कल वाढावा आणि पुस्तकांचे महत्त्व पटावे, या उद्देशाने गेल्या दोन-तीन वर्षांपासून सुनिल दाभाडे हे गुढीपाडव्याला पुस्तकांची गुढी उभारण्याचा अनोखा उपक्रम राबवत आहेत.
या पुस्तकांच्या गुढीमध्ये महाराष्ट्रातील थोर चित्रकार, शैक्षणिक ग्रंथ, स्पर्धा परीक्षा मार्गदर्शक, विचारवंतांची आत्मचरित्रे, कलेशी संबंधित पुस्तके, बोलकी चित्रे, गोष्टी, कविता, भारतीय संविधान, शिवाजी महाराज, संभाजी महाराज, सावित्रीबाई फुले, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, डॉ. ए.पी.जे. अब्दुल कलाम, माता रमाई, लोकमान्य टिळक, पोर्ट्रेट पेंटिंग, सामान्य ज्ञान, 'देव माणसं आणि गुणी लेकरं', 'श्यामची आई', भारतीय चित्रकार, ज्योतिष ग्रहयोग, थोर शास्त्रज्ञ, आरोग्यविषयक मार्गदर्शन आदी विषयांची पुस्तके समाविष्ट करण्यात आली आहेत.
विद्यार्थ्यांना वाचनाची गोडी लागावी, पुस्तके आपल्या जीवनाचा अविभाज्य भाग बनावीत आणि वाचनाची संस्कृती अधिक बळकट व्हावी, या हेतूने हा उपक्रम हाती घेण्यात आला आहे. भविष्यात अधिकाधिक विद्यार्थ्यांनी पुस्तकांबद्दल आपुलकी ठेवावी, असा संदेश या अनोख्या गुढीच्या माध्यमातून देण्यात आला आहे. सर्वांनी या पुस्तकाच्या गुढीचा आदर्श घ्यावा, अशी अपेक्षा सुनिल दाभाडे यांनी व्यक्त केली आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------