खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव: जळगाव शहरातील चंदूअण्णा नगरात एका तरुणाने खासगी सावकारीकडून होणाऱ्या तगाद्यांना कंटाळून गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना २७ मार्च रोजी दुपारी १२ वाजता उघडकीस आली. या घटनेनंतर कुटुंबीयांनी मोठ्या प्रमाणावर आक्रोश व्यक्त करत दोषींवर कठोर कारवाईची मागणी केली आहे.
कर्जाच्या ओझ्यामुळे जीवन संपवलं
मयत तरुणाचे नाव मुकेश अर्जुन पाटील (वय ३५, रा. चंदूअण्णा नगर, जळगाव) असे आहे. तो आपल्या पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता व एम. जे. कॉलेज परिसरात आयएमपी कम्प्युटर इन्स्टिट्यूट चालवत होता. कोरोनाकाळात संस्थेच्या चालवणीनिमित्त त्याने मोठ्या प्रमाणावर कर्ज घेतले होते. ओळखीच्या लवेश चव्हाण यांच्याकडून त्याने १ लाख २० हजार रुपये उसने घेतले होते. त्यापैकी ६५ हजार रुपये परत केले असले तरी व्याजासह उर्वरित रक्कम २ लाख ९५ हजार रुपयांवर गेली होती.
धमक्या आणि मानसिक तणावात आत्महत्या
२६ मार्च रोजी सकाळी ११ वाजता लवेश चव्हाण आणि त्याचे ४-५ साथीदार मुकेशच्या घरी आले. त्यांनी शिवीगाळ आणि धमकावून त्याची दुचाकी जबरदस्तीने हिसकावून नेली. या घटनेमुळे मुकेश मानसिक तणावात गेला आणि दुसऱ्याच दिवशी घरात एकट्याने गळफास घेत आत्महत्या केली.
कुटुंबीयांचा आक्रोश, कारवाईची मागणी
पत्नीने वारंवार फोन केला, पण प्रतिसाद न मिळाल्याने तिने शेजाऱ्यांना संपर्क केला. शेजाऱ्यांनी खिडकीतून पाहिल्यावर मुकेशने गळफास घेतल्याचे लक्षात आले. तातडीने पोलिसांना कळवण्यात आले. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. मृतदेह जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलवण्यात आला.
कुटुंबीयांनी मोठा आक्रोश व्यक्त करत “जोपर्यंत आरोपींवर गुन्हा दाखल होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही,” असा निर्धार व्यक्त केला आहे. या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पुढील तपास सुरू आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
आत्महत्या