खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जळगाव–छत्रपती संभाजीनगर महामार्गावर सोमवारी दुपारी घडलेल्या भीषण अपघातात सहा महिन्यांची गर्भवती महिला जान्हवी संग्राम मोरे (वय २१, रा. वाकोद जि. जळगाव) यांचा करुण अंत झाला. तर तिचा पती संग्राम जालमसिंग मोरे (वय २३, रा. कुलमखेड, जि. बुलढाणा) गंभीर जखमी झाला आहे.
घटनेची वेळ दुपारी सुमारास ३ वाजता अशी असून हा अपघात वाकोदनजीक दुभाजकावर झाला. पती-पत्नी सीएनजी इंधनावर चालणाऱ्या कार (क्र. एमएच २० जीव्ही २१२४) मधून छत्रपती संभाजीनगरच्या दिशेने जात होते. कार अचानक वाकोद जवळील दुभाजकाला आदळली आणि ती क्षणात पेट घेतली.
अपघाताच्या वेळी जान्हवी सहा महिन्यांची गर्भवती होती. ती नुकतीच माहेरी बोहार्डी (ता. भुसावळ) येथे आली होती आणि तिथून पतीसोबत परत जात होती. मात्र, काही क्षणांतच त्यांच्या आयुष्यावर दुःखाचा डोंगर कोसळला.
अपघातानंतर कारमधून मोठा स्फोट झाल्याचा आवाज परिसरात घुमला. योगायोगाने त्या ठिकाणापासून काही अंतरावर पहूर पोलिस स्टेशनचे अधिकारी पंचनामा करण्यासाठी आले होते. आवाज ऐकताच पोलिस तातडीने घटनास्थळी धावले. त्यांनी दगडाने कारच्या काचा फोडून संग्राम मोरे यांना बाहेर काढले. त्या वेळी त्यांनी पत्नी आत अडकलेली असल्याचे सांगितले.
पोलिसांनी तत्काळ प्रयत्न सुरू केले, मात्र तोपर्यंत कारने प्रचंड पेट घेतला आणि आत अडकलेल्या जान्हवीचा जागीच होरपळून मृत्यू झाला. संग्राम गंभीररीत्या भाजला असून त्याच्या दोन्ही पायांना जबर मार लागला आहे.
जखमी पतीला पहूर ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून पुढील उपचारासाठी हलविण्याची तयारी सुरू आहे. या दुर्दैवी घटनेमुळे वाकोद परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. अवघ्या २१ वर्षांची सहा महिन्यांची गर्भवती जान्हवी आणि तिच्या अजून जन्म न घेतलेल्या बाळाचा या अपघातात मृत्यू झाल्याने सर्वत्र दुःखाचे सावट पसरले आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
✒️ पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
अपघात