खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार I जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल यांच्या संकल्पनेतून साकार झालेल्या “जिल्हा परिषद आपल्या दारी” या अभिनव उपक्रमांतर्गत सोमवार, दि. 23 जून रोजी यावल पंचायत समिती येथे तक्रार निवारण दिन आयोजित करण्यात आला. या उपक्रमाला परिसरातील नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रमात नागरिकांकडून जिल्हा परिषद व तिच्या अधिनस्त विभागांशी संबंधित एकूण 24 तक्रारी प्राप्त झाल्या असून, त्या तक्रारींचे त्वरित निराकरण करण्याची कार्यवाही यावेळीच करण्यात आली. उपस्थित अधिकाऱ्यांनी संबंधित विभागांशी समन्वय साधून काही तक्रारींचे लगेचच निवारण केले, तर उर्वरित तक्रारींच्या समाधानासाठी निश्चित कालबद्ध कार्ययोजना आखण्यात आली.
कार्यक्रमास यावलचे आमदार मा. अमोल जावळे, चोपडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार मा. चंद्रकांत सोनवणे, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती मिनल करनवाल अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी रणधीर सोमवंशी, जिल्हा ग्रामीण विकास यंत्रनेचे प्रकल्प संचालक आर. एस. लोखंडे तसेच जिल्हा परिषदेचे सर्व विभाग प्रमुख व संबंधित अधिकारी उपस्थित होते.
तक्रार निवारण प्रक्रियेदरम्यान नागरिकांनी आपले प्रश्न, अडचणी व समस्या मोकळेपणाने मांडल्या. प्रशासनाच्या तत्पर प्रतिसादामुळे नागरिकांमध्ये समाधान व्यक्त करण्यात आले. या उपक्रमामुळे स्थानिक पातळीवर प्रशासनाशी थेट संवाद साधण्याची संधी नागरिकांना मिळाली असून, जिल्हा परिषद प्रशासनाच्या लोकाभिमुखतेचा प्रत्यय आला.
मुख्य कार्यकारी अधिकारी श्रीमती करनवाल यांनी यावेळी सांगितले की, “या उपक्रमाचा मुख्य उद्देश म्हणजे प्रशासन जनतेच्या दारी नेणे आणि तक्रारींचे तात्काळ निराकरण करून लोकांचा प्रशासनावरचा विश्वास अधिक दृढ करणे.”
जिल्हा परिषद आपल्या दारी उपक्रमाअंतर्गत अशा प्रकारचे तक्रार निवारण दिन तालुकास्तरावर नियमितपणे आयोजित करण्यात येणार असल्याची माहितीही त्यांनी दिली.
Tags
जळगाव