विजेच्या धक्क्याने म्हैस ठार; दोन वर्षांत तिसरी दुर्घटना, भरपाईचा प्रश्न कायम

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार - शहरातील मेहरूण तलाव परिसरात शनिवारी दुपारी विजेचा धक्का लागून एका म्हशीचा दुर्दैवी मृत्यू झाला. रविंद्र पुंडलिक हटकर (वय ४०, रा. गवळीवाडा, तांबापुर) हे नेहमीप्रमाणे आपल्या म्हशींना पाणी पिण्यासाठी तलावावर घेऊन गेले होते. पाणी पिऊन परत येताना एक म्हैस जवळच्याच विजेच्या खांबाला लागल्याने तिला विजेचा तीव्र धक्का बसला आणि ती जागीच मृत्यूमुखी पडली. या घटनेमुळे पशुपालक हटकर यांच्या डोळ्यात अश्रू अनावर झाले.

मृत म्हशीची अंदाजित किंमत सव्वा लाख रुपये असल्याचे सांगण्यात येत आहे. घटनेची माहिती मिळताच जिल्हा पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. चोपडे यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला असून एमआयडीसी पोलीस ठाण्यात याप्रकरणी नोंद करण्यात आली आहे.

विशेष म्हणजे, याच परिसरात दोन वर्षांपूर्वीही योगेश हटकर यांच्या मालकीच्या दोन म्हशींचा विजेचा धक्का लागून मृत्यू झाला होता. मात्र, अद्यापही त्यांना शासकीय नुकसान भरपाई मिळालेली नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या घटनांना आळा बसावा आणि नुकसानग्रस्त पशुपालकांना तात्काळ भरपाई मिळावी, अशी मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post