खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार I जळगाव जिल्ह्यातील पाचोरा शहरातून एक धक्कादायक घटना समोर आली असून, येथील एका शाळेत कार्यरत असलेल्या शिक्षकाने शाळेच्या वर्गखोलीत गळफास घेऊन आत्महत्या केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. ही घटना आज सकाळी सुमारे १० वाजेच्या सुमारास घडली असून, परिसरात प्रचंड खळबळ उडाली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, पाचोरा तालुक्यातील दहिगाव संत येथील रहिवासी असलेले रविंद्र महाले हे पाचोरा शहरातील एका खाजगी शाळेत शिक्षक म्हणून कार्यरत होते. ते सध्या पाचोरा येथे वास्तव्यास होते. आज सकाळी शाळा सुरू होण्यापूर्वीच त्यांनी शाळेच्या चौथ्या मजल्यावरील एका वर्गखोलीत दोरीने गळफास घेत आत्महत्या केली.
घटनेची माहिती मिळताच शाळेतील कर्मचाऱ्यांनी तत्काळ पाचोरा पोलिसांना कळवले. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला असून, मृतदेह उत्तरीय तपासणीसाठी पाचोरा ग्रामीण रुग्णालयात पाठवण्यात आला आहे.
आत्महत्येचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. पोलिसांनी या प्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून, पुढील तपास सुरू आहे.
दरम्यान, शिक्षकाने शाळेच्या आवारात आत्महत्या केल्याने सहकारी शिक्षक, विद्यार्थी आणि शाळेतील कर्मचाऱ्यांमध्ये शोककळा पसरली आहे. या दुर्दैवी घटनेने संपूर्ण परिसर हळहळ व्यक्त करत आहे.
Tags
जळगाव