बनावट क्रमांक लावून दुचाकीची विक्री, फसवणुकीचा प्रकार उघड – एलसीबीच्या तपासातून तिघे जेरबंद

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जिल्ह्यातील दुचाकी चोरीच्या घटनांचा तपास करत असताना स्थानिक गुन्हे शाखेच्या (एलसीबी) पथकाने एक धक्कादायक प्रकार उघडकीस आणला आहे. इन्शुरन्सची रक्कम लाटण्यासाठी चोरीचा बनाव करण्यात आला होता. पोलिसांनी या बनावट गुन्ह्याचा छडा लावत तिघांना अटक केली असून एक मोटार सायकल जप्त करण्यात आली आहे.

जिल्ह्यात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी व अपर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांनी एलसीबीचे वरिष्ठ निरीक्षक संदीप पाटील यांना मार्गदर्शन करून तपासाची जबाबदारी दिली होती. त्यानुसार एलसीबीच्या पथकाने विविध ठिकाणी तपास सुरू केला.

एलसीबीच्या पथकाला अशोक हिरामण मोरे (रा. दगडी मनवेल, ता. यावल) याच्याकडे चोरीची मोटार सायकल असल्याची माहिती मिळाल्यावर पथकाने त्याच्यावर पाळत ठेवली. पोलीस हवालदार प्रितमकुमार पाटील, पोहेकॉ यशवंत टहाकळे, पोकॉ बबन पाटील व प्रदीप सपकाळे यांनी त्याला ताब्यात घेऊन बजाज कंपनीची मोटार सायकल (क्र. MH-19-CC-6640)सह चौकशीसाठी एलसीबी कार्यालयात आणले.

तपासादरम्यान समोर आले की सुमारे पाच वर्षांपूर्वी अशोक मोरे याने रावेर येथील जुनी वाहने खरेदी-विक्री करणारा एजंट जफर शेख उस्मान (रा. जाम मोहल्ला, भुसावळ) यांच्या माध्यमातून प्रमोद निलेश कोळी (रा. हुडको कॉलनी, जळगाव रोड, भुसावळ) याच्याकडून मोटार सायकल खरेदी केली होती. ही मोटार सायकल बजाज फायनान्सकडून कर्जावर घेण्यात आली होती. हप्ते थकित असल्यामुळे इन्शुरन्स रक्कम मिळवण्यासाठी चोरीचा बनाव रचण्यात आला.

मुळ आर.टी.ओ. क्रमांक MH-19-DK-0755 असलेल्या दुचाकीला बनावट क्रमांक (MH-19-CC-6640) वापरून विकले गेले. प्रमोद कोळी याने भुसावळ शहर पोलीस ठाण्यात ३० डिसेंबर २०१९ रोजी दुचाकी चोरीची खोटी तक्रार दाखल केली होती (गुन्हा क्र. 285/2019, कलम 379 भादंवि). ही तक्रार खोटी असल्याचे आणि फायनान्स कंपनीची फसवणूक करण्याचा हेतू असल्याचे तपासात निष्पन्न झाले.

एलसीबीच्या पथकाने अशोक मोरे, एजंट जफर शेख उस्मान (वय ३४), व प्रमोद निलेश कोळी (वय ३७) यांना अटक करून दुचाकी जप्त केली असून पुढील कारवाईसाठी भुसावळ शहर पोलीस ठाण्याच्या ताब्यात दिले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post