जळगाव महापालिकेच्या कारवाईला यश; शाहू महाराज हॉस्पिटल प्रकरण उघड

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार - जळगाव शहर महानगरपालिकेच्या मालकीच्या जागेवर सन 2016 मध्ये पीपल बँक रामदास पाटील स्मृती सेवा ट्रस्टतर्फे अध्यक्ष प्रकाश बाबुलालजी चौबे यांना राजे छत्रपती शाहू महाराज रुग्णालय चालवण्यासाठी जागा देण्यात आली होती. मात्र, या ठिकाणी घरपट्टी आकारण्यात आलेली नव्हती.

माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी यावर वेळोवेळी प्रशासकांचे लक्ष वेधले आणि महानगरपालिकेच्या हिताचे भान ठेवत तक्रारी करून विषय पुढे नेला. त्यानंतर महापालिकेने 2016-17 पासून 2025-26 पर्यंतची घरपट्टी सुमारे 84,67,905 रुपये भरण्याच्या सूचना संस्थेला दिल्या. घरपट्टीचे मालमत्ता देयक 2025-26 या वर्षापासून ट्रस्टकडे पाठवण्यात आले आहे.

तसेच, महानगरपालिकेची शाळा क्र. 3 (पांजरापोळ चौक) या संस्थेला चालवण्यासाठी देण्यात आली होती. करारनाम्याप्रमाणे वर्षाकाठी 3,78,915 रुपये भाडे भरायचे असताना संस्थेने गेल्या 9 वर्षांपासून एकही रक्कम भरलेली नव्हती. या प्रकरणात देखील नाईक यांनी तक्रार केली आणि त्यानंतर महापालिकेने ट्रस्टला 33,69,759 रुपयांचे भाडे भरण्याची नोटीस बजावली.

घरपट्टीची वार्षिक रक्कम 1,70,511 रुपये असून एकूण 15,34,605 रुपये आणि दंड 3,68,305 रुपये असा एकूण 19,20,910 रुपयांचा हिशेब करण्यात आला आहे. या दोन्ही रकमेचा एकत्रित विचार करता संस्थेकडून 52,72,770 रुपये भरण्याचे आदेश देण्यात आले आहेत.

सदर कारवाईनंतर या संस्थेकडून महानगरपालिकेच्या तिजोरीत एकूण 1,37,40,475 रुपये जमा होणार आहेत. याशिवाय, जळगाव शहरातील आणखी 20 ते 25 संस्था रडारवर असून, त्याही महापालिकेला कराचा एकही रुपया भरलेला नाही. लवकरच या प्रकरणांवर देखील कारवाई होईल, अशी माहिती माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी दिली.

या ठोस कार्यवाहीबद्दल प्रशासक, उपायुक्त धनश्री शिंदे, घरपट्टी विभाग, प्रभाग अधिकारी, किरकोळ वसुली अधीक्षक व कर्मचारी यांचे माजी नगरसेवक प्रशांत नाईक यांनी अभिनंदन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post