पारोळा, पराग काथार I तालुक्यातील सुमठाणे शिवारात एका सुमारे ४५ वर्षीय महिलेचा डोक्यात दगड घालून निर्घृण खून केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. खून करून मृतदेह खताच्या गोणीत बांधून जंगलात फेकण्यात आला होता. ही घटना २५ जून रोजी रात्री साडे नऊच्या सुमारास समोर आली.
अमळनेर पोलीस निरीक्षक दत्तात्रय निकम यांना मिळालेल्या गोपनीय माहितीवरून त्यांनी सहाय्यक पोलीस निरीक्षक रवींद्र पिंगळे व त्यांच्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी धाव घेतली. त्यानंतर पारोळा पोलीस ठाण्याला माहिती देण्यात आली. घटनास्थळी पोहोचलेल्या पथकाला जंगलात पालापाचोळ्याखाली लपवलेला महिलेचा मृतदेह सापडला. पोलिसांच्या प्राथमिक तपासात डोक्यात दगड घालून हत्या करण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.
ही हत्या दोन दिवसांपूर्वी झाली असावी, असा पोलिसांचा प्राथमिक अंदाज आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी जळगावच्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात हलविण्यात आला असून, पारोळा पोलीस ठाण्यात अज्ञात आरोपीविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, सदर महिलेची ओळख अद्याप पटलेली नाही. त्यामुळे जिल्हा पोलीस दलाने नागरिकांना माहिती असल्यास पारोळा पोलीस ठाण्याचे निरीक्षक सचिन सानप किंवा एपीआय चंद्रसेन पालकर यांच्याशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे, अशी माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिली.
Tags
जळगाव