फत्तेपुर परिसरात खळबळजनक घातपात: वडिलांनीच मुलाचा दगडाने ठेचून खून करून प्रेत टाकले रस्त्यावर!

खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार I दि. २२ जून २०२५ रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास फत्तेपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतील कसवा पिंप्री ते पिंपळगाव चौखांवे रस्त्यावर एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. पोलीस तपासात ही घटना घातपाताची असल्याचे निष्पन्न झाले असून मृत व्यक्तीची ओळख कसवा पिंप्री येथील शुभम धनराज सुरळकर (वय अंदाजे २८) अशी पटली आहे.

घटनेनंतर फत्तेपुर पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तींविरोधात भा.दं.वि. कलम ३०२, २०१, ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला होता. पुढील तपासात या प्रकरणाचा सूक्ष्मपणे मागोवा घेतला असता, हे प्रेत रस्त्यावर टाकण्यात आले असून खून दुसऱ्याच ठिकाणी झाला असल्याचा पोलिसांना संशय आला. त्यामुळे कसवा पिंप्री परिसरात तपास अधिक गतीने सुरू झाला.

तपासादरम्यान मिळालेल्या माहितीवरून मृत शुभम सुरळकर याचा वडिलांशी नेहमीच वाद होत असल्याचे समोर आले. दारूच्या व्यसनामुळे शुभमची पत्नी माहेरी गेली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी शुभमच्या घरी तपास केला असता खोलीतील चटईखाली रक्ताचे डाग आढळून आले.

संशयावरून शुभमचे वडील धनराज सुरळकर यांना ताब्यात घेऊन सखोल चौकशी केली असता त्यांनी अपराध कबूल केला. चौकशीत त्यांनी सांगितले की, शुभमने नेहमीप्रमाणे दारूच्या नशेत घरात गोंधळ घातल्याने रागाच्या भरात रात्री झोपेत असताना दगडाने डोक्यात मारून त्याचा खून केला. त्यानंतर त्याचा मृतदेह हटवण्यासाठी दुसरा मुलगा गौरव आणि भाऊ हिरालाल यांना उठवून बोलावले व तिघांनी मिळून प्रेत गाडीत टाकून पिंपळगाव चौखांवे रस्त्यावर फेकून दिले.

या खूनप्रकरणी खालील आरोपींना अटक करण्यात आली आहे:
▪️ आरोपी क्र. १ – धनराज सुपडू सुरळकर (वय ५२)
▪️ आरोपी क्र. २ – गौरव धनराज सुरळकर
▪️ आरोपी क्र. ३ – हिरालाल सुपडू सुरळकर
(सर्व रा. कसवा पिंप्री, ता. जामनेर)

फत्तेपुर पोलीस स्टेशनच्या हद्दीतून आरोपी गौरव आणि हिरालाल यांना अटक करण्यात आली असून, पोलीस अधिक तपास करीत आहेत.

या संपूर्ण तपासकार्यात पुढील अधिकाऱ्यांचे योगदान:
▪️ पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी
▪️ अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर
▪️ उपविभागीय पोलीस अधिकारी धनंजय येरुळे
▪️ स्थानिक गुन्हे शाखा पोलीस निरीक्षक संदीप पाटील
▪️ फत्तेपुर पोलीस स्टेशनचे प्रभारी अधिकारी सहाय्यक पोलीस निरीक्षक अंकुश जाधव
▪️ तसेच स्थानिक गुन्हे शाखेचे व फत्तेपुर पोलीस स्टेशनचे पोलीस कर्मचारी

या प्रकरणाचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री. अंकुश जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
ही घटना समाजाच्या अंगावर शहारे आणणारी असून पोलिसांनी वेळेवर केलेल्या कारवाईमुळे खुनाचा उलगडा लवकर झाला.


Post a Comment

Previous Post Next Post