दिल्ली सीबीआय पोलिस असल्याचे सांगून निवृत्त डॉक्टराची ३१.५० लाखांची फसवणूक


चाळीसगाव, पराग काथार - दिल्ली सीबीआय पोलिस असल्याचे भासवून ‘सुनील कुमार’ नावाच्या अज्ञात व्यक्तीने चाळीसगाव तालुक्यातील ७३ वर्षीय निवृत्त वैद्यकीय अधिकाऱ्याची तब्बल ३१ लाख ५० हजार रुपयांची ऑनलाइन फसवणूक केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकरणी जळगाव येथील सायबर पोलीस ठाण्यात मंगळवारी, २४ जून रोजी रात्री ८ वाजता गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

१६ ते २३ जून दरम्यान संपर्क साधला
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, १६ जून ते २३ जून २०२५ या कालावधीत ‘सुनील कुमार’ नामक व्यक्तीने स्वत:ला दिल्ली येथील सीबीआय पोलिस असल्याचे भासवत, संबंधित निवृत्त डॉक्टरांशी संपर्क साधला. त्यांचे बँक खाते मनी लॉन्ड्रिंगप्रकरणात वापरले जात असल्याचे खोटे कारण देत, त्यांच्यावर मानसिक दबाव टाकण्यात आला.

विश्वास संपादन करत रक्कम हस्तांतरण
फसवणूक करणाऱ्याने अत्यंत कौशल्याने वृद्ध डॉक्टरांचा विश्वास संपादन करून, विविध कारणांनी त्यांच्याकडून वेगवेगळ्या टप्प्यांमध्ये एकूण ३१.५० लाख रुपये ऑनलाईन पद्धतीने आपल्या खात्यात वर्ग करवून घेतले.

सायबर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल
फसवणूक झाल्याचे लक्षात येताच संबंधित डॉक्टरांनी तात्काळ जळगाव सायबर पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानुसार, सुनील कुमार या व्यक्तीविरोधात आयटी कायदा व फसवणुकीच्या विविध कलमान्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक सतीश गोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post