मोठी बातमी I धरणगावात खळबळजनक प्रकार: नातवानेच आजीच्या डोक्यात केला कुऱ्हाडीने वार

वृद्ध महिला ही जळगावातील महाबळ परिसरातील रहिवाशी 

धरणगाव, पराग काथार I शेअर मार्केटमध्ये झालेल्या आर्थिक तोट्यामुळे झालेल्या वादातून एका नातवाने आपल्या आजीवर जीवघेणा हल्ला करत तिच्या डोक्यात कुऱ्हाडीने सपासप वार केल्याची धक्कादायक घटना धरणगाव शहरात गुरुवारी, २६ जून रोजी दुपारी सव्वा तीन वाजेच्या सुमारास घडली. गंभीर जखमी झालेल्या वृद्ध महिलेला तातडीने जळगावमधील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे.

जखमी महिला लीलाबाई रघुनाथ विसपुते (वय ७०, रा. महाबळ, जळगाव) या सध्या मुलगी वैशाली पोतदार यांच्या घरी धरणगावात मुक्कामी आल्या होत्या. वैशाली यांचा मुलगा तेजस विलास पोतदार (रा. धरणगाव) हा शेअर मार्केटमध्ये गुंतवणूक करत असून त्यावरून त्याने मोठ्या प्रमाणात कर्ज केले होते. या कर्जासंदर्भात लीलाबाई आणि तेजस यांच्यात पूर्वीपासून वाद सुरू होते.

गुरुवारी दुपारी पुन्हा एकदा दोघांमध्ये वाद झाला. त्यानंतर लीलाबाई झोपण्यासाठी बेडरूममध्ये गेल्या. यावेळी तेजसने कुऱ्हाड घेतली आणि त्याच्या भावाला "पिंपळाचे झाड तोडायला जातो" असे सांगून खाली उतरला. त्यानंतर, आजी झोपेत असतानाच तेजसने त्यांच्या डोक्यात कुऱ्हाडीने वार केले. हल्ल्यानंतर त्याने कुऱ्हाड घटनास्थळीच ठेवली आणि भावाकडे धावत जाऊन 'कोणीतरी आजीवर हल्ला केला' असा बनाव केला.

रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या लीलाबाई यांना तातडीने रुग्णवाहिकेतून उपचारासाठी जळगावच्या खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती गंभीर आहे.

घटनेनंतर लीलाबाई यांच्या नातवाने, उमेश धीरेंद्र विसपुते (रा. महाबळ), याने धरणगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार तेजस पोतदारविरोधात हत्या करण्याचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी त्याला अटक केली आहे. या प्रकरणाचा पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक संतोष पवार यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.

Post a Comment

Previous Post Next Post