खून प्रकरणातील जप्त ३० लाख रुपये अखेर नातेवाईकांच्या ताब्यात

खबर महाराष्ट्र न्यूज, पराग काथार I खोटेनगर परिसरातील सेवानिवृत्त परिचारिकेचा खून करून लंपास करण्यात आलेली ३० लाख रुपयांची रोकड अखेर मयत महिलेच्या नातेवाईकांच्या ताब्यात सुपूर्द करण्यात आली आहे. जळगाव तालुका पोलीस स्टेशनमध्ये दाखल असलेल्या या गंभीर गुन्ह्यातील ही रोकड सोमवारी (२३ जून) दुपारी १ वाजता सुपूर्द करण्यात आली. याबाबतची माहिती पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांनी दिली.

मयत स्नेहलता अनंत चुंबळे या मूळच्या नाशिक येथील रहिवासी आणि सेवानिवृत्त परिचारिका होत्या. त्यांच्याकडे असलेल्या ३० लाख रुपयांच्या रकमेच्या हव्यासापोटी दोन आरोपींनी कट रचून त्यांची निर्घृण हत्या केली होती. ही घटना २० ऑगस्ट २०२४ रोजी सायंकाळी सव्वा सहा वाजेच्या सुमारास घडली होती.

या प्रकरणी आरोपी जिजाबराव अभिमन्यू पाटील (वय ४८, रा. अमळनेर, मूळ रा. खडकीसिम, ता. चाळीसगाव) आणि विजय रंगराव निकम (वय ४६, रा. अमळनेर, मूळ रा. विचखेडा, ता. पारोळा) यांनी स्नेहलता चुंबळे यांचा खून करून त्यांच्या मृतदेहाची विल्हेवाट लावल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले आहे.

या प्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. पोलिसांनी तत्काळ कारवाई करत दोन्ही आरोपींना अटक केली असून त्यांच्याकडून खून प्रकरणाशी संबंधित ३० लाख रुपयांची रोकड जप्त करण्यात आली होती. हे दोन्ही आरोपी जळगाव जिल्हा परिषदेच्या सेवेत कार्यरत होते.

सदर जप्तीची रक्कम जिल्हा सत्र न्यायालयाच्या आदेशानंतर पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी यांच्या मार्गदर्शनाखाली फिर्यादी समीर उर्फ सौरभ संजय देशमुख आणि नातेवाईक संजय नानासाहेब देशमुख यांना अधिकृतपणे परत करण्यात आली.

Post a Comment

Previous Post Next Post