चाळीसगाव, पराग काथार - तालुक्यातील हातले तांडा येथे एका अत्यंत दुर्दैवी घटनेत १७ वर्षीय तरुणीचा दरवाजाला आलेल्या विद्युत प्रवाहामुळे मृत्यू झाल्याची घटना मंगळवार, दि. २५ जून रोजी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. धनश्री साईनाथ राठोड असे या मृत तरुणीचे नाव असून, तिच्या जाण्याने गावात व कुटुंबात शोककळा पसरली आहे.
धनश्रीच्या कुटुंबातील सर्वजण त्या दिवशी सकाळी कामानिमित्त बाहेर गेले होते. भाऊही घराबाहेर असताना धनश्रीने दरवाजाला कडी लावण्यासाठी हात घातला, त्याच वेळी दरवाजात आलेल्या विद्युत प्रवाहामुळे तिला तीव्र झटका बसला आणि ती बाजूला फेकली गेली.
नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील मीटरची वायर कट झाल्याने दरवाजात अचानक विद्युत प्रवाह उतरला होता. अपघातानंतर तिला तातडीने चाळीसगाव ग्रामीण रुग्णालयात नेण्यात आले, मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासल्यानंतर तिला मृत घोषित केले.
धनश्रीचे वडील साईनाथ काशिनाथ राठोड हे हातमजुरी करून उदरनिर्वाह करतात. तिच्या पश्चात आई, वडील व दोन भाऊ असा परिवार असून, घटनेनंतर संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. याप्रकरणी चाळीसगाव ग्रामीण पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
Tags
जळगाव