संविधान हत्या दिनानिमित्त चाळीसगावात आणीबाणीतील सेनानी व कुटुंबीयांचा आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते गौरव

चाळीसगाव, पराग काथार I भारतीय लोकशाहीच्या इतिहासातील सर्वाधिक अंधकारमय अध्याय म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आणीबाणीला आज ५० वर्ष पूर्ण झाली. यानिमित्ताने भारतीय जनता पक्ष चाळीसगाव शहर मंडळातर्फे ‘संविधान हत्या दिन’ पाळत, आणीबाणीच्या काळात अन्यायाचा प्रतिकार करून तुरुंगवास भोगणाऱ्या सेनानी व त्यांच्या कुटुंबीयांचा सन्मान सोहळा आमदार मंगेश चव्हाण यांच्या हस्ते संपन्न झाला.

छत्रपती शिवाजी महाराज चौक मैदानावर झालेल्या कार्यक्रमात स्व. डॉ. वा.ग. पूर्णपात्रे, स्व. शिवाजी दत्तात्रय पालवे, स्व. जगन्नाथ गोबन राठोड, स्व. सुखलाल मराठे, पंडित रामचंद्र स्वार, स्व. नागो वस्ताद महानुभाव, दिनकर देविदास देव व अन्य सेनानींच्या वारसांचा सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमात माजी सेनानी व त्यांच्या कुटुंबीयांनी आणीबाणी काळात झेललेल्या यातना, सरकारकडून झालेला छळ, लोकशाहीवरील आघात, व त्यांना सहन करावा लागलेला अन्याय याबाबत आपले अनुभव उपस्थितांसोबत शेअर केले.

यावेळी आमदार मंगेश चव्हाण यांनी संवाद साधताना सांगितले की, “२५ जून १९७५ या दिवशी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी केवळ सत्तेच्या लालसेपोटी संविधानाच्या अनुच्छेद ३५२ चा गैरवापर करत देशावर आणीबाणी लादली. त्या काळात नागरिकांचे मूलभूत अधिकार काढून घेण्यात आले, प्रसारमाध्यमांवर सेन्सॉरशिप लादण्यात आली, हजारो निष्पाप नागरिकांना फक्त विरोध केल्यामुळे तुरुंगात डांबण्यात आले. हा काळ म्हणजे संविधानाचा गळा घोटण्याचा काळ होता.”

ते पुढे म्हणाले, “अटल बिहारी वाजपेयी, जयप्रकाश नारायण, नानाजी देशमुख यांसारख्या नेत्यांनी त्याकाळात झुकणं नाकारत लोकशाहीचा दीप जिवंत ठेवला. त्यांच्या त्यागामुळेच १९७७ मध्ये लोकशाही पुन्हा उभी राहिली आणि काँग्रेसला जनतेने सत्तेवरून दूर केलं.”

कार्यक्रमाचे आयोजन केवळ ऐतिहासिक आठवणी जपण्यासाठी नव्हते, तर लोकशाहीच्या रक्षणासाठी जागरुकता निर्माण करण्यासाठी करण्यात आले होते. आजच्या पिढीला हे समजणे गरजेचे आहे की, लोकशाही ही सरकारची देणगी नसून ती जनतेच्या सततच्या संघर्षातून टिकून असते.

कार्यक्रमाच्या समारोपाप्रसंगी उपस्थितांनी ‘संविधान व लोकशाहीच्या रक्षणासाठी सदैव कटिबद्ध राहण्याची’ शपथ घेतली. या वेळी भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.


Post a Comment

Previous Post Next Post