जळगाव पोलिसांची धडक कारवाई – शनिवार बाजारातून मोबाईल चोरणाऱ्या टोळी गजाआड


खबर महाराष्ट्र न्यूज पराग काथार I जळगाव जिल्ह्यात मोबाईल चोरीच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याने पोलीस प्रशासनाने या प्रकरणांकडे गांभीर्याने पाहत कारवाईला गती दिली आहे. पोलीस अधीक्षक महेश्वर रेड्डी व अप्पर पोलीस अधीक्षक अशोक नखाते यांच्या मार्गदर्शनाखाली, तसेच उपविभागीय अधिकारी संदीप गावीत यांच्या नेतृत्वात व पोलीस निरीक्षक बबन आव्हाड यांच्या सूचनेनुसार मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांचा शोध घेण्यासाठी विशेष पथक तयार करण्यात आले होते.

दि. २१ जून २०२५ रोजी शनिवारच्या बाजाराच्या दिवशी, पोलीस उपनिरीक्षक राहुल तायडे, पो.उ.नि. चंद्रकांत धनके, पो.ना. प्रदीप चौधरी व पो.कॉ. रतन गीते हे बाजार परिसरात पेट्रोलिंग करत असताना तीन संशयित व्यक्ती फिरताना आढळले. त्यांना थांबवून तपासणी केली असता त्यांच्या जवळून ४ मोबाईल मिळून आले. या मोबाईल्सबाबत विचारणा केली असता त्यांनी समाधानकारक उत्तर दिले नाही.

या संशयावरून त्यांना पोलिस ठाण्यात आणून सखोल चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान आरोपींनी पाल टाकून राहत असलेल्या शेतामध्ये, झाडाजवळ जमिनीत खड्डा खोदून एका पिशवीत मोबाईल लपवून ठेवले असल्याचे कबूल केले. पोलिसांनी सदर ठिकाणी जाऊन तपास केला असता, त्या पिशवीतून एकूण ३३ मोबाईल फोन (किंमत अंदाजे ४.०९ लाख रुपये) जप्त करण्यात आले.

या प्रकरणात अटक करण्यात आलेला आरोपी नोरसिंह गुजरिया (वय २३, रा. इंदोर, मध्यप्रदेश) याने जिल्ह्यातील विविध बाजारांमध्ये मोबाईल चोरी केल्याचे कबूल केले आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला असून, आरोपी सध्या पोलीस कोठडीत आहे. पुढील तपास पो.ना. हेमंत जाधव हे करत आहेत. जप्त करण्यात आलेल्या ३३ मोबाईलपैकी एक मोबाईल रावेर पोलीस ठाण्याच्या हद्दीतून चोरीस गेलेला असल्याचे निष्पन्न झाले. रावेर पोलीस ठाण्याचे पोलीस अंमलदार महेश मोगरे यांनी घटनास्थळी जाऊन तपास केला असता, रावेर परिसरातून चोरीस गेलेले एकूण ८ मोबाईल त्यांच्याकडे सुपूर्द करण्यात आले.

शहरातील किंवा जिल्ह्यातील ज्यांचे मोबाईल गहाळ किंवा चोरीस गेलेले असतील त्यांनी एमआयडीसी पोलीस स्टेशन येथे संपर्क साधावा. मोबाईलचा IMEI नंबर तपासून माहिती मिळवता येईल.

Post a Comment

Previous Post Next Post