खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव, शहरात अवैध गौमांस कत्तली आणि विक्रीवर पोलिसांनी मोठी कारवाई करत तीन जणांना अटक केली आहे. रविवारी (९ फेब्रुवारी) दुपारी ३ वाजता मास्टर कॉलनी परिसरात ही धडक कारवाई करण्यात आली. पोलिसांनी तब्बल १५० किलो गौमांस जप्त करत आरोपींकडून कत्तलीसाठी वापरण्यात येणारी धारदार हत्यारे देखील हस्तगत केली आहेत.
गुप्त माहितीच्या आधारे पोलिसांची कारवाई
गुन्हे शोध पथकाचे पोलीस निरीक्षक संदीप पाटील यांना मिळालेल्या गोपनीय माहितीनुसार मास्टर कॉलनीत काही लोक घरातच अवैधरीत्या गौवंश कत्तल करून मांस विक्री करत असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर पोलीस उपनिरीक्षक चंद्रकांत धनके, पोलीस नाईक किशोर पाटील, पोलीस शिपाई गणेश ठाकरे, छगन तायडे, किरण पाटील आणि योगेश घुगे यांच्या पथकाने तातडीने कारवाई करत छापा टाकला.
रिक्षातून होत होती अवैध गौमांस वाहतूक
पोलिसांनी तपास सुरू करताच युसूफ खान समशेर खान (वय ५०, रिक्षाचालक, रा. तांबापुरा, जळगाव) हा १०० किलो गौमांस घेऊन जाताना रंगेहात आढळून आला. पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले असता त्याने हे मांस शेख शकील शेख चाँद (वय ३८, रा. मास्टर कॉलनी, जळगाव) याच्याकडून खरेदी केल्याचे कबूल केले.
घरातच चालू होता अवैध कत्तलखाना!
युसूफ खानकडून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी शेख शकील शेख चाँद यांच्या घराची झडती घेतली. त्याठिकाणी आसीफ खान लतीफ खान (वय ३०, रा. इस्लामपुरा, शनिपेठ, जळगाव) याच्या मदतीने घरातच गायींची कत्तल करून मांस विकले जात असल्याचे उघड झाले. पोलिसांनी ५० किलो गौमांस, तसेच कत्तलीसाठी वापरण्यात येणारी कुऱ्हाड, सुरा आणि इतर धारदार हत्यारे जप्त केली.
गौवंश हत्या प्रतिबंधक कायद्यांतर्गत गुन्हा दाखल
या घटनेनंतर जळगाव शहर पोलिस ठाण्यात तिघांविरुद्ध गौवंश हत्या प्रतिबंधक कायदा आणि भारतीय दंड संहितेच्या विविध कलमांनुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सुरू असून, या अवैध व्यवसायाशी संबंधित इतर व्यक्तींचा शोध घेतला जात आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------
Tags
क्राईम