खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | जळगाव – शहरातील एमआयडीसी परिसरात शनिवारी पहाटे तीन चोरट्यांनी दोन वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये चोरी करत सुमारे ४ लाख ८ हजार रुपयांची रोकड लंपास केली. ग्रीन एन इको सोल्युशन आणि आर.जी. इंटरप्रायझेस या दोन कंपन्यांमध्ये हा प्रकार घडला असून, सीसीटीव्ही फुटेजमध्ये चोरटे कैद झाले आहेत. एमआयडीसी पोलिस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून तपास सुरू आहे.
पहिली घटना : ग्रीन एन इको सोल्युशन कंपनीतील चोरी
एमआयडीसीमधील ई सेक्टरमध्ये जिग्नेश शरद शेठ (वय ४५) यांच्या मालकीची ग्रीन एन इको सोल्युशन कंपनी आहे. शुक्रवार, २१ फेब्रुवारी रोजी त्यांच्या कुटुंबीयांचा बाहेरगावी प्रवास असल्याने ते कंपनीच्या वरील मजल्यावरील घरात एकटे झोपले होते. पहाटे २ वाजता तीन चोरट्यांनी कंपनीचे शटर वाकवून आत प्रवेश केला. कार्यालयातील कपाट उघडून त्यांनी ३ लाखांची रोकड चोरली.
सकाळी कामगार कंपनीत आल्यावर शटर वाकलेले दिसले. त्यांनी लगेचच जिग्नेश शेठ यांना माहिती दिली. त्यांनी आत जाऊन पाहिले असता, संपूर्ण सामान अस्ताव्यस्त फेकलेले आढळले. सीसीटीव्ही फुटेजमध्ये तीन चोरटे २.२० ते ३.३० वाजेदरम्यान चोरी करताना स्पष्टपणे दिसत आहेत.
दुसरी घटना : आर. जी. इंटरप्रायझेसमधील चोरी
तसेच, त्याच रात्री पंकज गुणवंत टोगळे यांच्या आर. जी. इंटरप्रायझेस कंपनीतही चोरी झाली. चोरट्यांनी मध्यरात्रीच्या सुमारास कपाट फोडून १ लाख ८ हजार रुपयांची रोकड लंपास केली.
सीसीटीव्ही फुटेजमधून तपास सुरू
दोन्ही घटनांमध्ये तीनच चोरटे असल्याचे स्पष्ट झाले आहे. हे चोरटे हाफ चड्डी आणि चेहऱ्याला मोठा रुमाल बांधून आले होते. पोलिसांनी दोन्ही कंपन्यांचे सीसीटीव्ही फुटेज जप्त करून तपास सुरू केला आहे. पोलिसांचा अंदाज आहे की एकाच टोळीने दोन्ही चोरीच्या घटना घडवल्या असाव्यात.
एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन्ही घटनांची नोंद करून चोरट्यांचा शोध सुरू करण्यात आला आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------