खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | कजगाव, ता. भडगाव – कजगाव भडगाव मार्गालगत असलेल्या कजगाव शिवारातील वसंत श्रीधर अमृते यांच्या शेतातील विहिरीत एका अनोळखी तरुणीचा मृतदेह पाण्यात तरंगत असल्याचे निदर्शनास आले. ही बाब लक्षात येताच शेतकऱ्याने तातडीने कजगावचे पोलीस पाटील राहुल पाटील यांना कळविले. त्यांनी भडगाव पोलीस स्टेशनला माहिती दिली, त्यानंतर पीएसआय सुशील सोनवणे यांच्या नेतृत्वाखालील पथकाने घटनास्थळी पाहणी केली.
पथकात कजगाव बीटचे पोलीस नाईक नरेंद्र विसपुते आणि इतर पोलीस कर्मचारी होते. प्राथमिक तपासात मृत तरुणीचे अंदाजे वय २५ वर्षे असल्याचे समजते. तिच्या डाव्या हाताच्या अंगठ्यावर मागील बाजूस इंग्रजीत 'पी' असे गोंदलेले आहे, त्यामुळे तिची ओळख पटवण्यास मदत होऊ शकते.
सदर घटनेबाबत भडगाव पोलीस स्टेशनमध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून, पोलीस निरीक्षक पांडुरंग पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे. तरुणीच्या मृत्यूचे कारण तसेच ती कोण आहे याचा शोध घेण्यासाठी पोलीस विविध मार्गांचा अवलंब करत आहेत.
या घटनेमुळे परिसरात चिंतेचे वातावरण पसरले असून, स्थानिक नागरिकांमध्ये विविध चर्चांना उधाण आले आहे. पोलिसांनी नागरिकांना कोणतीही अफवा न पसरवण्याचे आवाहन करत, जर कोणाला सदर तरुणीबाबत माहिती असेल तर त्यांनी भडगाव पोलीस स्टेशनशी संपर्क साधावा, असे आवाहन केले आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------