मधमाशांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू.


खबर महाराष्ट्र न्युज, पराग काथार | अमळनेर तालुक्यातील जळोद येथे बुधवारी (दि. ७ फेब्रुवारी) एक दुर्दैवी घटना घडली. नदीकाठावर धार्मिक विधी करत असताना मधमाशांच्या हल्ल्यात पुजाऱ्याचा मृत्यू झाला. अमोल शुक्ल (वय ३८, रा. पाठक गल्ली, अमळनेर) असे मृत पुजाऱ्याचे नाव आहे.

कशी घडली घटना?

डॉ. काकासाहेब देशमुख यांच्या अकराव्या पुण्यतिथीनिमित्त पूजा ठेवण्यात आली होती. ही पूजा नदीकाठावर करण्याचा निर्णय घेण्यात आला. अमोल शुक्ल यांच्या मार्गदर्शनाखाली पुलाखालील जागी पूजा सुरू असताना होमामुळे निर्माण झालेल्या धुरामुळे तेथे असलेल्या मधमाश्यांच्या पोळ्याला धक्का बसला. त्यामुळे भडकलेल्या मधमाश्यांनी हल्ला चढवला.

मधमाश्यांचा हल्ला आणि घबराट

मधमाश्यांच्या हल्ल्यामुळे पूजेला उपस्थित असलेले लोक घाबरून पळू लागले. मात्र, पुजारी अमोल शुक्ल यांनी लोकांना शांत राहण्याचा सल्ला दिला. "पळू नका, खाली झोपा, तर मधमाश्या चावत नाहीत" असे त्यांनी सांगितले. स्वतःही त्यांनी खाली झुकण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्यावरच मोठ्या प्रमाणात मधमाश्यांनी हल्ला केला. विशेषतः त्यांच्या चेहऱ्यावर मधमाश्यांनी जोरदार दंश केला.

प्राण गमवावा लागला

अमोल शुक्ल यांना मधुमेह आणि रक्तदाबाचा त्रास असल्याने मधमाश्यांच्या दंशाचा त्यांच्यावर गंभीर परिणाम झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी अमळनेर येथे हलवण्यात येत होते, मात्र वाटेतच त्यांचा श्वास थांबला आणि त्यांचा मृत्यू झाला.

इतर पाच ते सहा जण जखमी

या हल्ल्यात इतर पाच ते सहा जणांनाही मधमाश्यांनी चावा घेतला. त्यांचे अंग सुजले असून त्यांच्यावर अमळगाव ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

पोलीस कारवाई

या घटनेची नोंद अमळनेर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू म्हणून करण्यात आली आहे.

ही घटना संपूर्ण परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. धार्मिक विधी दरम्यान घडलेल्या या दुर्दैवी घटनेने शुक्ल कुटुंबीयांवर शोककळा पसरली आहे.

----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !

📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4

📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------

Post a Comment

Previous Post Next Post