खबर महाराष्ट्र न्युज, प्रतिनिधी | जळगाव – मध्य प्रदेशच्या सीमेवर उमर्टी गावाजवळ चोपडा ग्रामीण पोलिसांवर जमावाने अचानक हल्ला केला. संशयित आरोपीला अटक करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर १०० ते १५० लोकांच्या जमावाने हल्ला चढवला. या दरम्यान हवेत गोळीबार करण्यात आला, ज्याला प्रत्युत्तर म्हणून पोलिसांनीही गोळीबार करत जमावाला तितर-बितर करण्याचा प्रयत्न केला. या झटापटीत दोन पोलिस अधिकारी व कर्मचारी जखमी झाले असून, एक पोलीस कर्मचाऱ्याचे अपहरणही करण्यात आले होते. मात्र, मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने त्याची सुटका करण्यात आली.
संशयित आरोपीच्या अटकेदरम्यान हल्ला
चोपडा ग्रामीण पोलीस स्टेशनचे निरीक्षक व त्यांच्या पथकाला उमर्टी गावात देशी कट्टा तयार करण्याचा अवैध कारभार सुरू असल्याची गोपनीय माहिती मिळाली होती. या पार्श्वभूमीवर पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून खात्री करून घेतली. त्यानंतर सहाय्यक पोलीस निरीक्षक शेषराव नितनवारे व त्यांच्या सात सहकाऱ्यांनी संशयित आरोपी पप्पीसिंग याला अटक करण्यासाठी कारवाई केली.
संशयिताला ताब्यात घेऊन पोलिसांचे पथक गावाबाहेर निघत असताना मोठा जमाव अचानक पोलिसांसमोर आला. जमावाने पोलिसांवर हल्ला करण्याचा प्रयत्न केला आणि काहींनी हवेत गोळीबार केला. परिस्थिती हाताबाहेर जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनीही प्रत्युत्तरादाखल हवेत गोळीबार करून जमावाला पांगवण्याचा प्रयत्न केला.
पोलिस कर्मचाऱ्याचे अपहरण व सुटका
हल्ल्याच्या गोंधळात काही जमावाने पोलिस कॉन्स्टेबल शशिकांत पारधी यांचे अपहरण करून त्यांना गावात घेऊन गेले. घटनेची माहिती मिळताच पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी तातडीने घटनास्थळी दाखल झाले. मध्य प्रदेश पोलिसांच्या मदतीने शोधमोहीम राबवून शशिकांत पारधी यांची अखेर सुखरूप सुटका करण्यात आली.
संशयित आरोपीला अटक, गुन्हा दाखल
पोलिसांनी संशयित आरोपी पप्पीसिंग याला ताब्यात घेतले असून, उमर्टी गावातील या हल्ल्याच्या प्रकरणी मध्य प्रदेश पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे.
घटनेने खळबळ
या धक्कादायक घटनेमुळे परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून, पोलीस दलाने पुढील कारवाईसाठी कमालीची सतर्कता बाळगली आहे. पोलिसांवर अचानक झालेल्या या हल्ल्यामुळे कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
----------------------------------
आपण आपल्या परिसरातील बातमी व व्हिडीओ 8149343743 या क्रमांकावर पाठवू शकता !
📲 व्हाटसॲप ग्रुप जॉईन करा : https://chat.whatsapp.com/HIC8hI6o9FBAlod6RWM7J4
📹 युट्युब चॅनल सबस्क्राईब करा : https://www.youtube.com/@KhabarMaharashtraNews
---------------------------------
पराग काथार - संपादक
+918149343743
----------------------------------